रेल्वे रुळावर भरलेला सिलेंडर ठेवून घातपाताचा प्रयत्न; पुण्यातील धक्कादायक प्रकार

पुण्यात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. रेल्वे रुळावर भरलेला सिलेंडर ठेवून घातपाताचा प्रयत्न झाला आहे. 

वनिता कांबळे | Updated: Dec 30, 2024, 08:28 PM IST
रेल्वे रुळावर भरलेला सिलेंडर ठेवून घातपाताचा प्रयत्न; पुण्यातील धक्कादायक प्रकार title=

Pune News : रेल्वे रुळावर भरलेला सिलेंडर ठेवून घातपाताचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे.  उरूळी कांचनच्या हद्दीत 29 डिसेंबर रोजी रात्री पावणे अकराच्या सुमारास लोको पायलटच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. याप्रकणी उरूळी कांचन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

दरम्यान, घटनेचे गांभीर्य ओळखून रेल्वे व रेल्वे पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळास भेट देवून तपासाच्या व सुरक्षेच्या दृष्टीने सूचना केल्या.याप्रकरणी रेल्वेचे लोको पायलट शरद शहाजी वाळके, (वय 38 ) यांनी फिर्याद दिली आहे.  उरूळी कांचन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोको पायलट शरद वाळके हे नेहमीनुसार रविवारी  रात्री आपल्या हद्दीतील रेल्वे मार्गाची पाहणी करत होते. त्यांना रात्री पावणे अकराच्या‌ सुमारास उरूळी कांचनच्या हद्दीत पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वे रुळावर (रेल्वे विद्युत पोल किलोमीटर नंबर २१९/७-५) प्रिया गोल्ड कंपनी गॅसचा सिलेंडर आढळला. त्यांनी ते सिलेंडर उचलण्याचा प्रयत्न केला असता, सिलेंडरमध्ये गॅस (3900 किं ग्रॅम वजन) असल्याचे लक्षात आले. तत्काळ वाळके यांनी ते सिलेंडर रेल्वे रुळापासून दूर नेत अज्ञात व्यक्तीचा घातपात घडविण्याचा कट उधळून लावला. 

शरद वाळके या प्रकाराची माहिती तात्काळ पोलिसांना व वरीष्ठांना दिली. त्यानुसार उरूळी कांचन पोलिसांना रेल्वेच्या कलम 150, 125 नुसार अज्ञात व्यक्तीवर घातपाताचा घडवण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, घटनेचे गांभीर्य ओळखून रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, दौंड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस,  उरुळी कांचन पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील  यांनी घटनास्थळास भेट दिली. अधिक तपास उरूळी कांचन पोलिस करत आहेत.