थर्टी फर्स्ट नियम मोडणाऱ्यांची खैर नाही! नाकाबंदी, सुरक्षा व्यवस्थेबद्दल सर्वकाही जाणून घ्या!

31st December: पोलीस दलातर्फे ठिकठिकाणी नाकाबंदीचे आयोजन करण्यात येणार असून गर्दीच्या ठिकाणी गस्त/फिक्स पॉईंट बंदोबस्त नेमण्यात येणार आहे. 

Updated: Dec 30, 2024, 07:33 PM IST
थर्टी फर्स्ट नियम मोडणाऱ्यांची खैर नाही! नाकाबंदी, सुरक्षा व्यवस्थेबद्दल सर्वकाही जाणून घ्या!
31 डिसेंबर

31st December: नववर्षाच्या स्वागताला आता काही तास उरले आहेत. सर्वांनी नवीन वर्षाच्या स्वागताचे प्लानिंग केले आहे. पण हे प्लानिंग करताना तुम्ही नियमांचे उल्लंघन करत असाल तर सावधान! कारण पोलिसांची करडी नजर तुमच्यावर आहे. मुंबई, नवी मुंबई, उल्हासनगर या शहरांमध्ये कशी सुरक्षा व्यवस्था असेल, याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. मुंबईत  नववर्ष आगमनानिमित्त कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलीस दलाकडून वाहतुक विभागासह 8 अपर पोलीस आयुक्त, 29 पोलीस उप आयुक्त, 53 सहायक पोलीस आयुक्त यांच्यासह 2184 पोलीस अधिकारी, 12048 पोलीस अंमलदार असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. त्यांचेसोबत महत्वाच्या ठिकाणी एस.आर.पी.एफ. प्लाटून, क्युआरटी टिम, बीडीडीएस टिम, आरसीपी प्लाटून, होमगार्डस् असा चोख पोलीस बंदोबस्ताचे आयोजन करण्यात आलेले आहे.

Add Zee News as a Preferred Source

तसेच पोलीस दलातर्फे ठिकठिकाणी नाकाबंदीचे आयोजन करण्यात येणार असून गर्दीच्या ठिकाणी गस्त/फिक्स पॉईंट बंदोबस्त नेमण्यात येणार आहे. वाहतुक  नियमांचे उल्लंघन व "ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह" विरोधात विशेष मोहिम राबविण्यात येणार असून विविध आस्थापना व गुन्हेगारांची तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे.

मद्य पिऊन वाहन चालवणारे व्यक्ती, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणारे व्यक्ती, महिलांशी गैरवर्तवणूक करणारे व्यक्ती, अनधिकृत मद्य विक्री करणाऱ्या आस्थापना, अंमलीपदार्थ विकी/सेवन यासारखी बेकायदेशीर कृत्य करणारे व्यक्ती यांचे विरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तरी सर्व नागरिकांनी नियमांचे भान ठेवून नववर्ष आगमन उत्साहाने व जल्लोषात साजरे करावे असे आवाहन बृहन्मुंबई पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.

दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर कारवाई 

थर्टी फर्स्टला दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी उल्हासनगर परिमंडळातील उल्हासनगर अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये २९ ठिकाणी नाकाबंदी केली जाणार असून 102 अधिकारी आणि 625 कर्मचाऱ्यांसह SRPF ची एक प्लाटून तैनात असणार आहे, अशी माहिती उल्हासनगरचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे. थर्टी फर्स्टला पहाटे चार वाजेपर्यंत बार आणि रेस्टॉरंट सुरू राहणार असून त्यामुळे अनेक जण रात्री उशिरा दारू पिऊन गाड्या चालवण्याची शक्यता आहे. यात कोणताही अपघात किंवा अनुचित प्रकार होऊ नये, या अनुषंगाने पोलिसांकडून उल्हासनगर परिमंडळातील उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर शहरात 29 ठिकाणी नाकाबंदी केली जाणार आहे. 

यामध्ये ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस केल्या जाणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे. तसंच थर्टी फर्स्टच्या रात्री तडीपार गुन्हेगार, रेकॉर्डवरील गुन्हेगार, गुंड यांच्या शोधासाठी ''ऑपरेशन ऑल आउट'' राबवलं जाणार असल्याचीही माहिती गोरे यांनी दिली आहे. परिमंडळ ४ मध्ये थर्टी फर्स्टच्या रात्री कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तब्बल 102 कर्मचारी आणि 625 कर्मचाऱ्यांची फौज तैनात असणार असून SRPF ची एक प्लाटून देखील पोलिसांच्या सोबतीला तैनात असणार आहे, अशी माहितीही सचिन गोरे यांनी दिली आहे.

100 क्रमांकावर फोन करण्याचे आवाहन 

तसेच कुठेही अनुचित प्रकार होत असेल तर नागरीकांनी तात्काळ पोलीस मदतीसाठी १०० या क्रमांकावर संपर्क साधावा असेही पोलिसांनी आवाहन केले आहे.

About the Author