close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

अभिनेता हृतिक रोशनचा सुपर-३० चित्रपट पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

नोव्हेंबर २०१८ दरम्यान हा चित्रपट प्रदर्शित होणार होता.

Updated: Jun 18, 2019, 03:45 PM IST
अभिनेता हृतिक रोशनचा सुपर-३० चित्रपट पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

प्रेरणा कोरगांवकर, झी मीडिया, मुंबई : अभिनेता हृतिक रोशनचा सुपर ३० हा चित्रपट पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. नोव्हेंबर २०१८ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. पण अद्याप या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित होत नसल्याचं दिसून येतं आहे. अनेक वादांमुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख पुढे ढकलण्याची वेळ निर्माता- दिग्दर्शकांवर आली आहे.

२०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या काबिल चित्रपटानंतर हृतिक रोशनचा अद्याप कोणाताही चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल झालेला नाही. खरंतर 'काबिल' नंतर हृतिक सुपर ३० या चित्रपटाच्या तयारीला लागला. आयआयटी कोचिंग संस्थेचे संस्थापक आनंद कुमार यांच्यावर आधारित या चित्रपटात हृतिक आनंद कुमार यांची भूमिका साकारणार आहे. नोव्हेंबर २०१८ मध्ये हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल होणार होता. पण हा चित्रपट सतत वादाच्या भोवऱ्यातून अडकत गेला.

मागील वर्षी सुरु झालेल्या मीटू मोहिमेअंतर्गत निर्माते-दिगदर्शक विकास बहल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे विकास बहल यांना चित्रपटातून हटवण्यात आलं. त्यामुळे अर्थात चित्रपटाचं शुटींग थांबलं. पुढे या चित्रपटासाठी २७ जानेवारी ही प्रदर्शनाची तारिख ठरवण्यात आली. पण २५ जानेवारीला कंगना रानौतचा मणिकर्णिका हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल होण्यासाठी सज्ज होता. यात हृतिक आणि कंगनाचा जुना वाद बी-टाऊनला काही नवीन नाही. 

पुन्हा वाद होण्यापासून टाळण्यासाठी हृतिकनं स्वत:च समजूदारपणा दाखवत आपलं पाऊल मागे टाकत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुन्हा पुढे ढकलली. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. या ट्रेलरला ४० दशलक्षहून अधिक प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाल्याचं दिसून येत आहे.

आता पुन्हा एकदा हृतिकचा सुपर ३० वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्ह दिसू लागलीत. कारण आयआयटीच्या काही विद्यार्थ्यांनी सुपर ३०चं प्रदर्शन रोखण्यासाठी कंबर कसली आहे. २०१८ मध्ये या विद्यार्थ्यांनी आयआयटीत विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून दिल्याचा आनंद कुमार यांचा दावा खोटा आहे.' अशी जनहित याचिका न्यायालयात दाखल केली होती. याबाबत आनंद कुमार यांच्या विरोधात अद्याप केस सुरु आहे. या प्रकरणाचा अद्याप निकाल लागलेला नाही. अशात या चित्रपटातून चुकीचा संदेश जावू शकतो, त्यामुळे चित्रपटाचं प्रदर्शन थांबणं गरजेचं असल्याचं विद्यार्थांच्या वकिलांनी म्हटलं आहे.

या वादाच्या चक्रीवादळातून हृतिक आणि त्याचा सुपर-३०  कधी बाहेर पडतोय आणि प्रदर्शित होतो की आणखीन पुढे ढकलला जातो. हे पाहणं महत्त्वाचं ठरणारं आहे.