'मुस्लिमांचे वर्चस्व असणाऱ्या बॉलीवूडमध्ये मी मराठ्यांचा इतिहास दाखवणारा चित्रपट बनवला'

हिंदी चित्रपटसृष्टीचा शंभर वर्षाच्या काळात मराठ्यांचा इतिहास दाखवणारा एकही चित्रपट तयार करण्याची यांची लायकी नाही. 

Updated: Sep 4, 2020, 06:11 PM IST
'मुस्लिमांचे वर्चस्व असणाऱ्या बॉलीवूडमध्ये मी मराठ्यांचा इतिहास दाखवणारा चित्रपट बनवला' title=

मुंबई: मुस्लिमांचे वर्चस्व असणाऱ्या बॉलीवूड इंडस्ट्रीत मी पहिल्यांदा मराठ्यांचा इतिहास दाखवणारा चित्रपट तयार करण्याची हिंमत दाखवली, असे वक्तव्य अभिनेत्री कंगना राणौत हिने केले आहे. मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची उपमा दिल्यामुळे कालपासून कंगनावर सर्व स्तरांतून टीकेचा भडिमार सुरु आहे. मात्र, कंगनाही या टीकेला तितक्याच इर्ष्येने प्रत्युत्तर देत आहे. 

या सगळ्या पार्श्वभूमीवर कंगनाने शुक्रवारी संध्याकाळी नवे ट्विट केले. यामध्ये कंगना राणौतने शिवसेनेवर आगपाखड केली आहे. तिने म्हटले आहे की, हिंदी चित्रपटसृष्टीचा शंभर वर्षाच्या काळात मराठ्यांचा इतिहास दाखवणारा एकही चित्रपट तयार करण्याची यांची लायकी नाही. मात्र, मुस्लिमांचे वर्चस्व असणाऱ्या बॉलीवूड इंडस्ट्रीत मी पहिल्यांदा शिवाजी महाराज आणि झाशीच्या राणीवर चित्रपट तयार केला. त्यासाठी मी जीव आणि कारकीर्द पणाला लावली होती. मात्र, महाराष्ट्राच्या या ठेकेदारांनी आजवर काय केले, असा जळजळीत सवाल कंगना राणौतने शिवसेनेला विचारला. 

याशिवाय, कंगनाने पालघर हत्याकांडाचा मुद्दा उकरून काढत महाविकासआघाडी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. तुम्ही पालघरमध्ये साधुंना दगड आणि काठ्यांनी ठेचून मारले. मात्र, त्याचे कोणतेही परिणाम तुम्हाला भोगावे लागले नाहीत. या सगळ्यामुळेच तुमची हिंमत वाढली आहे. त्यामुळे तुम्ही मला जाहीरपणे मारण्याची धमकी देत आहात, असे कंगनाने म्हटले.

शिवसेनेचं ठरलं; ९ तारखेला कंगनाला नेहमीच्या स्टाईलने उत्तर देणार 

तर दुसरीकडे कंगनाच्या या वक्तव्यांवर शिवसेनेच्या गोटातूनही सातत्याने प्रतिक्रिया उमटत आहेत. येत्या ९ तारखेला कंगना राणौत मुंबईत येणार आहे. त्यावेळी कंगनाला शिवसेना स्टाईल इंगा दाखवण्याचा चंग शिवसैनिकांनी बांधला आहे. त्यामुळे आता ९ तारखेला काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.