प्रोफेसर ते अभिनेता... असा होता कादर खान यांचा थक्क करणारा प्रवास!

दीर्घकाळापासून सिनेसृष्टीपासून दूर असलेल्या कादर खान यांचं जाणं मात्र बॉलिवूडला हळहळायला लावणारं आहे

Updated: Jan 1, 2019, 11:05 AM IST
प्रोफेसर ते अभिनेता... असा होता कादर खान यांचा थक्क करणारा प्रवास!  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेते कादर खान यांनी वयाच्या ८१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय. दीर्घकाळापासून ते आजारी होते. त्यांच्यावर कॅनडातील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. दीर्घकाळापासून सिनेसृष्टीपासून दूर असलेल्या कादर खान यांचं जाणं मात्र बॉलिवूडला हळहळायला लावणारं आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी बॉलिवूडला ही दु:खद बातमी मिळालीय. 'बस आवाज ही काफी है...' असं म्हटलं की काही कलाकारांचे चेहरे आपोआपच डोळ्यांसमोर येतात. अशाच चेहऱ्यांमधील एक म्हणजे ज्येष्ठ अभिनेते कादर खान... भापल्या भारदस्त आवाजाच्या आणि तितक्याच प्रभावी भूमिकांच्या बळावर कादर खान यांनी कलाविश्वात वेगळं स्थान प्रस्थापित केलं. १९७३ मध्ये त्यांनी चित्रपटविश्वातील कारकिर्दीची सुरुवात केली आणि जवळपास ३०० चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.

अधिक वाचा :- ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचं निधन

काबूलमध्ये जन्म

कादर खान यांचा जन्म अफगाणिस्तानातल्या काबूलमधला... कादर खान यांच्या बालपणीच्या काळाविषयी सांगावं तर, त्यांनी अत्यंत हलाखीचे दिवस पाहिले. अतिशय हलाखीच्या परिस्थितीत काळ घालवणाऱ्या खान यांनी त्यांना अभिनयासाठी बालपणी मिळालेली रुपयाची नोटही याच गरिबीखातर खर्चावी लागली होती. गरिबीपुढे हतबल झालेल्या खान यांची परिस्थिती त्यांच्या आईलाही जाणवत होती. त्यांचे वडील फाळणीपूर्व भारतातील माटा इक्बाल पिशीन या भागातील होते. पण, त्यांच्या तीन मोठ्या भावांच्या निधनानंतर अखेर खान यांच्या कुटुंबाने मुंबईत येण्याचा निर्णय घेतला.

प्रोफेसर म्हणून काम...

अभिनय क्षेत्रात सक्रिय होण्यापूर्वी कादर खान यांनी अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करत मुंबई विद्यापीठाच्या युसूफ इस्माईल माहिवद्यालयातून सिव्हील इंजिनिअर या क्षेत्रातील पदवी मिळवली होती. ज्या बळावर त्यांनी सिव्हील इंजिनिअरिंच्या विद्यार्थांना या क्षेत्रातील धडे गिरवण्यास मदत केली. एम.एच. साबू सिद्दीक महाविद्यालयात त्यांनी सुरुवातीचे काही दिवल प्राध्यापकाची नोकरी केली.

सिनेसृष्टीत प्रवेश

मुंबईत आल्यानंतर महाविद्यालयीन आयुष्यात असणाऱ्या खान यांचा अभिनय अभिनेता दिलीप कुमार यांनी पाहिला आणि सगिना, बैराग या चित्रपटांसाठी त्यांची निवड केली. पाहता पाहता या झगमगत्या कलाविश्वात खान यांनी पाय रोवण्यास सुरुवात केली. रोटी या चित्रपटातील संवाद लेखनासाठी मनमोहन देसाई यांनी खान यांना तब्बल १ लाख २० हजार इतकं घसघशीत मानधन दिलं होतं. चित्रपटांमध्ये काम करण्याचा त्यांचा कधीच मनसुबा नव्हता. मुळात त्यावेळी चित्रपटांमध्ये काम करण्याकडे कमी दर्जाचं काम म्हणून पाहिलं जायचं.

संवाद लेखन आणि अभिनय

पटकथा लेखनाच्या निमित्ताने त्यांनी अनेकदा मनमोहन देसाई आणि प्रकाश मेहरा यांच्यासोबत काम केल्याचं पाहायला मिळालं. देसाई यांच्यासोबत 'धरम वीर', 'गंगा जमुना सरस्वती', 'कूली', 'देश प्रेमी', 'सुहाग', 'परवरिश', 'अमर अकबर अँथनी' हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट... तर मेहरा यांच्यासोबत 'ज्वालामुखी', 'शराबी', 'लावारिस' आणि 'मुकद्दर का सिकंदर' हे त्यांचे गाजलेले चित्रपट...

पाहता पाहता कादर खान यांनी आपली ओळख अशी काही प्रस्थापित केली की यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी त्यांना फारसा वेळ लागला नाही. 'हिंमतवाला', 'मै खिलाडी तू अनाडी', 'कूली नंबर १', 'हिरो नंबर १' हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट...

अधिक वाचा :- कॉमेडीचा बादशाह कादर खान यांचे 5 लोकप्रिय कॉमेडी सीन

कलाविश्वातील त्यांच्या या योगदानासाठी त्यांना २०१३ मध्ये शिरोमणी पुरस्कार, १९८२ मध्ये फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट संवाद लेखनाचा पुरस्कार, १९९३ मध्ये सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. जवळपास २५० हून अधिक चित्रपटांसाठी संवाद लेखन करणाऱ्या या अभिनेत्याला नव्या काळाने मात्र मागे टाकलं आणि त्यांचं अस्तित्व धूसर होत गेलं.

कॅनडाचं नागरिकत्व स्वीकारलं

तीन मुलांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या साथीने कादर खान कॅनडाला स्थायिक झाले. तेथेच त्यांनी नागरिकत्व स्वीकारत भारतीय कलाविश्वातून काढता पाय घेतला. आज ते प्रेक्षकांपासून कैक मैल दूर असले तरीही एक अभिनेता म्हणून असणारा त्यांचा वावर आणि चित्रपट विश्वातील त्यांचं योगदान या साऱ्याच्या बळावर ते नेहमीच आपल्यात असतील, असं म्हणायला हरकत नाही.