Kajol Birthday Special : बॉलिवूड अभिनेत्री काजोल ही आघाडीची अभिनेत्री आहेत. आज काजोलचा 49 वा वाढदिवस आहे. काजोलचं लग्न अजय देवगणसोबत झालं असून त्या दोघांचा सुखी संसार सुरु आहे. त्यांना दोन मुलं आहेत. काजोलच्या या कुटुंबाविषयी सगळ्यांना ठावूक आहे. पण तिच्या वडील आणि आईकडच्या कुटुंबाविषयी जास्त कोणाला माहित नाही आहे. त्यानिमित्तानं तिच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया.
काजोलचे कुटुंब चित्रपटसृष्टीत अनेक वर्षांपासून आहे. आई तनूजा मराठी कुटुंबातली आणि वडील चित्रपट निर्माते शोमू मुखर्जी हे बंगाली. मावशी नुतन सर्वाधिक पाच वेळा फिल्म फेअर पुरस्कार पटकावलेली नामांकित अभिनेत्री. काजोलची पणजी रतन बाई आणि आजी शोभना समर्थ यांच्या वारशाखाली काजोल तयार झाली. इतकेच नव्हे तर काका जॉय मुखर्जी आणि देव मुखर्जी हे देखिल त्यांच्या काळातील गाजलेले कलावंत. काजोलने 1992 मध्ये 'बेखुदी' या चित्रपटाच्या माध्यामातून जेव्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं, तेव्हा तिच्या पदरी साफ निराशा पडली. काजोल दिसायला सर्वसामान्य तरुणींसारखीच सामान्य आहे.
'बाजीगर' चित्रपटात नवख्या शाहरुख खानसोबत आपल्या अभिनयाची चुणूक दाखवत तिने बॉलिवूडमधले आपले स्थान पक्के केलेच. या जोडीने नंतर मग अनेक हीट चित्रपट दिले. शाहरुखच्या यशामागे काजोल सोबत जमलेली केमिस्ट्री हा देखील महत्त्वाचा विषय म्हटला पाहिजे. मात्र, त्यानंतरच्या अनेक चित्रपटात तिने अनेक उल्लेखनीय भुमिका केल्या. त्यात हळुवार प्रेमाची अनुभूती देणारी दिलेवाले... मधली सिमरन असो किंवा 'गुप्त' मधली आक्रमक खलनायिका अनेक चित्रपटात तिने अभिनयाची जादुगरी दाखविली. त्यानंतर तिने शाहरूखसोबत करण- अर्जुन, कुछ कुछ होता है आणि कभी खुशी कभी गम यारखे अनेक हीट चित्रपट केले. 'दिलवाले...'मध्ये आजही जोरदार गर्दी खेचण्याची क्षमता आहे. या चित्रपटानेच तिला पहिल्यांदा उत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्म फेअर पुरस्कारही मिळवून दिला.
24 फेब्रवारी 1999 मध्ये तिने अभिनेता अजय देवगण सोबत लग्न केले. बॉलिवूडमध्ये लग्न झालेल्या हिरोईनचे करिअर नंतर पूर्णतः संपल्याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र, लग्नानंतरही काजोलने पती अजय देवगण सोबतही यशस्वी चित्रपट केले. शाहरुखसोबत केलेला ‘कभी खुशी कभी गम’ हा हीट चित्रपट आहे. तर अजयसोबत काही वर्षांपूर्वी केलेला ‘तानाजी’ चित्रपटाचाही समावेश आहे. ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटासाठी तिला उत्कृष्ट् अभिनेत्रीचे अनेक पुरस्कार मिळाले. तर तिसरा फिल्म फेअर पुरस्कार ही पटकाविला. आमिर खान सोबत तिने 'फना' हा तर अजय देवगण सोबत 'यु मी और हम' हा हीट चित्रपट दिला. तर शाहरुखच्या 'ओम शाती ओम' मध्ये आपल्या डान्सचे जलवे दाखविले.
काजोलने पती अजय देवगण सोबत चित्रपट निर्मिती व्यवसाय करत आहे. काजोल एक सामाजिक कार्यकर्ता देखील आहे. 2008 साली काजोलला कर्मवार पुरस्कारानं गौरवण्यात आलं. तिच्या समाज कार्यासाठी हा पुरस्कार मिळाला. काजोल सध्या तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'द ट्रायल' वेबसिरीजमुळे चर्चेत आहे.
काजोल नुकतीच द ट्रायल या वेब सीरिजमध्ये झळकली. या वेब सीरिजमधील तिच्या अभिनयानं सगळ्यांची मने जिंकली आहेत. तर याच सीरिजमध्ये काजोलनं तिची नो किसिंग पॉलिसी मोडली आहे. त्याआधी काजोल ही 'द लस्ट स्टोरीज 2' या चित्रपटात दिसली होती.