'देवी' समाजातील भयाण वास्तव मांडणारा लघुपट

लघुपट पाहताना तो तुमच्या अंगावर आल्याशिवाय राहणार नाही 

Updated: Mar 4, 2020, 11:58 AM IST
'देवी' समाजातील भयाण वास्तव मांडणारा लघुपट  title=

मुंबई : महाराष्ट्रासह अनेक राज्यात महिला सुरक्षित नसल्याचं भयाण वास्तव वेगवेगळ्या घटनांमधून समोर येत असतं. निर्भया गँगरेप प्रकरणाला सात वर्षे उलटूनही अद्याप पीडितेला न्याय मिळत नाही. असं असताना बलात्कारी पीडित तरूणीची आत्मकथा या 'देवी' या शॉर्ट फिल्ममध्ये मांडली आहे. 

 बलात्कार करून पीडितेला मारून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न प्रत्येक आरोपी करतो. यामध्ये पीडितेचा बळी जातो. यामध्ये त्या पीडितेचा काय दोष? यावर भाष्य करणारी "देवी' ही शॉर्ट फिल्म आहे. या लघुपटाने आपल्याला थोडा पुढचा विचार करायला भाग पाडलं आहे. बलात्कार पीडितेच्या मरणानंतरच्या भावना यामध्ये दाखवल्या आहेत.  

संजय मिश्रा यांची 'देवी' ही शॉर्ट फिल्म अंगावर आल्याशिवाय राहणार नाही. यामध्ये 5 वर्षांपासून ते अगदी साठीच्या महिलेवर बलात्कार झालेल्या सर्व पीडिता एका खोलीत राहताना दाखवल्या आहेत. प्रत्येकीवर बलात्कार करणारा व्यक्ती वेगळा आहे. त्याचं वय वेगळं आहे. बलात्कारानंतर पीडितेचा मृत्यू झाला त्याचं कारण वेगळं आहे. पण त्यांना होणारी वेदना ही मात्र एकसारखी आहे. 

महिलांवरील अत्याचारावर भाष्य करणारी ही शॉर्टफिल्म 'महिला सुरक्षित आहेत का?' हा प्रश्न पुन्हा अधोरेखित करतात. यामध्ये काजोलने पहिल्यांदा शॉर्टफिल्ममध्ये काम केलंय. 'देवी' हा लघुपट ९ महिलांच्या आयुष्याभोवती फिरताना दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आहे. ९ वेगळ्या वयाच्या विचारांच्या आणि धर्माच्या महिला एका छताखाली राहतात तेव्हा कोण-कोणत्या समस्या समोर येतात हे या चित्रपटाच्या माध्यमातून  चाहत्यांना अनुभवता येणार आहे.