मुंबई : नेहमी वादाचा मुकूट डोक्यात मिरवाणारी अभिनेत्री कंगना रानौत सध्या सर्वत्र चर्चेत आहे. चालू घडामोडींवर कंगना कायम तिचे मत मांडत असते. दरम्यान कंगनाने राजकारणात एन्ट्री करण्याचे संकेत दिले आहेत. तिने या संदर्भात एक ट्विट करून सर्वांना गोंधळात टाकलं आहे. माझं फक्त चित्रपटांवर प्रेम आहे. पण सध्याची स्थिती पाहता मी कदाचीत.... असं म्हणत कंगनाने राजकारणात सक्रिय होण्याचा इशारा दिला आहे.
कंगना ट्विट करत म्हणाली, 'नवा दिवस, नवी केस... अनेक राजकारणी पक्ष माझ्यावर गुंतवणूक करण्यास तयार आहेत, जसं मी एक नेता आहे. प्रत्येक दिवशी मला एका राजकारणी व्यक्ती प्रमाणे घेतलं जातं. न्यायालयीन खटले, विरोधी पक्षांचा सामना.. परंतू माझ्याकडे समर्थन नाही. माझं फक्त चित्रपटांवर प्रेम आहे. पण सध्याची स्थिती पाहता मी कदाचीत....'
दरम्यान, मुंबई पोलिसांनी कंगना आणि तिच्या बहिणीला दोनदा समन्स बजावले होते. त्याचवेळी अभिनेत्रीने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती आणि तिच्या व रंगोलीविरोधातील एफआयआर रद्द करण्याची विनंती केली होती, परंतु हायकोर्टाने तिची याचिका मान्य केली नाही.
त्यानंतर 8 जानेवारी रोजी कंगना बहिण रंगोलीसोबत वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावली. समाजात तेढ निर्माण करण्याच्या आरोपाखाली दाखल झालेल्या गुन्ह्यात जबाब नोंदवण्यासाठी तिला समन्स पाठवण्यात आले.