मुंबई : अभिनेत्री शबाना आझमी यांनी सुरु केलेल्या 'दीपिका बचाओ' कॅम्पेनला कंगनानं मात्र पाठिंबा देण्यास नकार दिला... आणि पुन्हा एकदा वादाची फोडणी पडली.
अर्थातच याची चर्चा होणार नाही, असं तर होणारच नाही. स्वत:ला महिला सबलीकरणासाठी झटणारी अभिनेत्री असं म्हणवून घेणारी कंगना आता मात्र दीपिकाला पाठिंबा देत नाही यावर बरीच टीका झाली. याच टीकेला कंगनानं जाहीर उत्तर दिलंय.
काही दिवसांपूर्वी 'पद्मावती'च्या वादातून या सिनेमाची अभिनेत्री दीपिका पादूकोण हिला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या... दीपिकाला मारणाऱ्याला बक्षीसही जाहीर करण्यात आलं. त्यानंतर अभिनेत्री शबाना आझमी यांनी दीपिकाला पाठिंबा दर्शवण्यासाठी 'दीपिका बचाओ' कॅम्पेन सुरू केलं.
या कॅम्पेनसाठी जया बच्चन, हेमा मालिनी, सोनाक्षी सिन्हा, आलिया भट्ट, अनुष्का शर्मा, विद्या बालन, परिणीती चोपडा, प्रियांका चोपडा यांसहीत अनेक बॉलिवूड कलाकारांनी एका याचिकेवर सह्या केल्यात. परंतु, कंगनानं मात्र या याचिकेवर सही करण्यास नकार दिला... त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. याचिकेवर सही नाही म्हणजे दीपिकाला पाठिंबा नाही, असा काहीसा याचा अर्थ घेण्यात आला.
आपल्यावर होणारी टीका पाहून अखेर कंगनानं आपण या याचिकेवर हस्ताक्षर करण्यास नेमका का नकार दिला, यामागचं कारणही जाहीर केलंय. 'जोधपूरमध्ये मी मणिकर्णिकाचं शूटिंग करत होते, तेव्हा माझ्या मैत्रिणीचा अनुष्का शर्माचा मला फोन आला. तिनं मला शबाना आझमीलिखित एका याचिकेवर सही करण्यासाठी विचारलं... तेव्हा मी अनुष्काला सांगितलं की माझा दीपिकाला पूर्ण पाठिंबा आहे परंतु, शबाना आझमी यांच्या डावे विरुद्ध उजवे राजकारणापासून मला लांब राहायचंय. देशातील सध्याच्या वातावरणात माझी एक वेगळी विचारधारा आहे. मी दीपिका बचाओसारख्या अनेक महिलावादी अभियानां सहभागी झालेय. पण जेव्हा माझी प्रतारणा होत होती तेव्हा माझ्या चरित्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांनी सुरू केलेल्या कॅम्पेनमध्ये मी सहभागी होऊ शकत नाही. अनुष्काला मी काय म्हणतेय ते समजलं... दीपिकाला माझा पूर्ण पाठिंबा राहील आणि कोणाच्याही कॅम्पेनचा भाग न बनता दीपिकाला पाठिंबा देण्याचं सामर्थ्य माझ्यात आहे, आणि हेच मला योग्य वाटतंय' असं कंगनानं म्हणत आपलं म्हणणं ठामपणे मांडलंय.