Kapil Sharma Success Story: इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता म्हणून ओळख मिळवलेला कपिल शर्मा आज आपला43 वा जन्मदिवस साजरा करतोय. एका छोट्याश्या लाफ्टर शोमधून कपिल शर्माने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. यानंतर आता तो 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चालवतोय. हा शो नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज झालाय. याआधी त्याने 'द कपिल शर्मा शो' चे अनेक सिझन केले आहेत. कपिलचा शो नेहमी चर्चेत असतो. कपिलने सिनेमातूनदेखील आपले नशिब आजमावले आहे. काही दिवसांपुर्वी तो करिना कपूर, तब्बू आणि कृति सेनन यांच्या क्रू या सिनेमात दिसला होता. आज वाढदिवसानिमित्त कपिल शर्माचा संघर्ष जाणून घेऊया.
कपिल शर्माचा जन्म 2 एप्रिल 1987 रोजी पंजाबच्या अमृतसरमध्ये झाला. त्याचे वडील जितेंद्र कुमार एक हेड कॉन्स्टेबल आणि आई हाऊसवाईफ होती.त्याला एक मोठा भाऊ आणि बहीण आहे. कपिल हा लहानपणापासूनच खूप मस्तीखोर होता. टीव्ही बघून अभिनेत्यांची नक्कल करणे हे त्याच्या आवडीचे होते. छोट्या मोठ्या नकला करुन तो आजुबाजूच्यांना खूप हसवायचा.
कपिल 22 वर्षाचा असताना त्याचे वडील जितेंद्र यांचे कॅन्सरमुळे निधन झाले. यानंतर परिवाराला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. वडिलांच्या मृत्यूनंतर कपिलला पोलीस विभागात नोकरीची संधी चालून आली होती. पण त्याने ती नाकारली. आपण एक सिंगर बनावे, असे त्याला लहानपणापासूनच वाटत होते. यानंतर कपिल थिएटरमध्ये नाटक करु लागला.
जबाबदारीमुळे कमी वयापासूनच त्याला नोकरी करावी लागली. सुरुवातीच्या काळात त्याने पीसीओमध्ये काम केले. येथे त्याला 500 रुपये पगार मिळायचा. यानंतर त्याने दहावी उत्तीर्ण केली आणि एका कापड गिरणीत काम करु लागला. जिथे त्याला 900 रुपये महिना मिळायचे. आपल्या कमाईतून तो म्युझिकची आवड पूर्ण करत होता. ग्रॅज्युएशननंतर सुट्टीमध्ये तो नोकरीच्या शोधात मुंबईत पोहोचला. पण त्याला काही दिवसांनी अमृतसरला परतावं लागलं.
कपिलने आपल्या करिअरची सुरुवात 500 रुपये पगारापासून केली. आजच्या घडीला कपिल शर्मा 300 कोटींच्या प्रॉपर्टीचा मालक आहे. त्याच्याकडे अलिशान घर, गाडी आणि करोडोची संपत्ती आहे. द ग्रेड इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कॉमेडी क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या कपिल शर्माने स्वत:चा शो सुरु केला. 'द कपिल शर्मा' शोनंतर आलेला 'द ग्रेट इंडियन कपिल शो' त्याच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला.