मुंबई : एका सत्यघटनेवर आधारित कथानकाचा आधार घेत साकारण्य़ात आलेल्या 'आर्टिकल १५' या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच काही दिवसांपूर्वी अडचणींनी डोकं वर काढलं आहे. प्रदर्शनासाठी सज्ज असणाऱ्या या चित्रपटाला करणी सेना आणि ब्राह्मण महासंघाकडून विरोध करण्यात येत आहे. किंबहुना या चित्रपटाचं प्रदर्शन थांबवण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
अनुभव सिन्हा दिग्दर्शित 'आर्टिकल १५' हा चित्रपट येत्या 28 जूनला बॉक्स ऑफिसवर दाखल होतोय. मात्र या चित्रपटाला महाराष्ट्र करनी सेना आणि ब्राह्मण महासंघाने विरोध होत असल्याचं पाहायला मिळत आहे. चित्रपटातील कथा आणि संवादांवर या संघटनांकडून आक्षेप घेण्यात आला आहे.
संबंधित प्रकरणी महाराष्ट्र करणी सेनेचे अध्यक्ष अजय सिंह सेंगर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं सांगण्य़ात येत आहे. हिंदू धर्म आणि ब्राह्मण समाजाविषयी यात गलिच्छ भाषा वारण्यात आल्याचा आरोप ब्राह्मण महासंघाने केला आहे .
सोमवारी या चित्रपटाचा विरोध करत मुंबईत निदर्शनंही करण्यात आली. चित्रपटात दाखवण्यात आलेली एकंदर दृश्य पाहता त्या माध्यमातून ब्राह्मणांचं चित्रण चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याची बाब अधोरेखित करण्यात आली आहे. याविषयीचं पत्रक अनुभव सिन्हा यांच्या निवासस्थानी जवळपास पंधरा दिवसांपूर्वी पाठवण्यात आलं होतं. पण, या पत्राला कोणतंच उत्तर देण्यात आलं नसल्याची माहिती ब्राह्मम महासंघाच्या पंडित पंकज जोशी यांनी इंडियन एक्स्प्रेसशी संवाद साधताना दिली होती.