Kiran Mane Viral Post : मराठी अभिनेते किरण माने हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. किरण माने (Kiran Mane) यांनी 15 दिवसांपूर्वी शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी हाती शिवबंधन बांधलं. मी एक संवेदनशील अभिनेता म्हणून माणूस म्हणून उद्धव ठाकरेंसोबत येण्याचा निर्णय घेतला, असं म्हणत त्यांनी राजकारणात उडी मारली होती. अशातच आता किरण माने यांनी मनोज जरांगे पाटील यांचा मुंबईकडे येत असलेल्या मोर्चावर (Manoj jarange Patil Morcha) एक पोस्ट लिहिली आहे.
काय म्हणाले किरण माने?
"आम्ही हक्काचं आरक्षण मागतोय. बाकी कुठल्याही जातीवर अन्याय न करता ते द्या." अशी मागणी करत लाख्खोंच्या संख्येनं मराठा समाज बाहेर पडलाय. आपल्या अधिकारासाठी संवैधानिक मार्गानं आंदोलन सुरू आहे. या गर्दीत माझे स्वत:चे कितीतरी नातेवाईक आहेत. आपल्या पुढच्या पिढ्यांच्या सुरक्षिततेच्या चिंतेनं त्यांना हे पाऊल उचलायला मजबूर केलंय, असं किरण माने (Kiran Mane On Maratha Reservation) यांनी म्हटलं आहे.
वयाची सत्तरी पार केलेले माझे एक नातेवाईकसुद्धा आंदोलनात हट्टाने सामील झालेत. मी फोन केला, "तुमची तब्येत आम्हाला महत्त्वाची आहे. परत या... लोकांनी घरात बसून टीव्हीवर राममंदिराचा सोहळा बघावा म्हणून सुट्टी दिलीय सगळ्यांना. नातवंडं, पाहुणे आलेत. एकत्र मिळून बघा... ते म्हणाले, "नाही. ते बघून काय मिळनारंय? महागाई कमी हुनारंय का आपल्या पोरांना रोजगार मिळनारंय? आता आरक्षणातच माझा राम आहे. मुंबई हीच अयोध्या. नातवंडांसाठीच मी हे करतोय. आम्ही दुसर्याच्या ताटातला घास हिसकावून घेत नाही. आमचा हक्काचा आमच्या नातवंडांच्या मुखात पडायला हवा."
मोर्चा जिथे जिथे जातोय तिथे दलित, मुस्लिम, धनगर, माळी असा सगळा समाज पाण्यापासून खाण्याची सगळी सोय बघतोय. ग्राऊंड लेव्हलवरचा बहुजन फुटलेला नाही, हे आशादायी चित्र आहे. राजकीय चित्र काहीही दाखवूदेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रचंड इच्छा होती. ते म्हणालेही होते की 'एक दिवस मराठा समाजाला आरक्षणाची गरज भासेल, पण त्यावेळी ते द्यायला मी नसेन', अशी पोस्ट किरण माने याने केली आहे.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील अंतरवाली सराटी येथून 20 जानेवारीला मुंबईच्या दिशेने आपली पदयात्रा सुरू केली आहे. आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाता हा लढा असाच चालू राहील. आता ही आरपारची लढाई असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. मनोज जरांगे पाटलांच्या मोर्चाचा तिसरा दिवस आहे. आज मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मोर्चा अहमदनगर जिल्ह्यातून पुणे जिल्ह्यातील रांजणगावच्या दिशेनं रवाना झाला आहे.