'ईडीच्या भितीनं भलेभले 'त्या' कळपात जाऊ लागेल...', किरण मानेंची पोस्ट चर्चेत

Kiran Mane : किरण माने यांनी सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Oct 1, 2023, 03:21 PM IST
'ईडीच्या भितीनं भलेभले 'त्या' कळपात जाऊ लागेल...', किरण मानेंची पोस्ट चर्चेत title=
(Photo Credit : Social Media)

Kiran Mane : छोट्या पडद्यावरील अभिनेते किरण माने हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते त्यांचं मत मांडताना दिसतात. आता किरण माने यांनी पुण्यातील गांधी भवन येथे होणाऱ्या कार्यक्रमाची माहिती दिली आहे. गांधी भवनात होणारा हा कार्यक्रम उद्या 2 ऑक्टोबर गांधी जयंती निमित्तानं आयोजित करण्यात आला आहे. किरण माने यांनी शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

महात्मा गांधींसाठी किरण माने यांची खास पोस्ट

किरण माने यांनी त्यांच्या फेसबूक अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी महात्मा गांधी यांचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शन दिलं आहे की, 'अच्छा हुआ बापू रियल में नहीं है यार, अगर आज वो यहाँ होता ना… तो ये डरे हुए लोगों का देश देख के बहुत रोता था यार! लगे रहो मुन्ना भाईमधला मुन्नाभाईचा हा डायलॉग त्यावेळी फक्त आवडला होता. आजच्या काळात रोज आठवून अंगावर शहारा येतो. खरंच हा देश 'डरे हुए' किंवा 'डराए गये' लोगोंका देश झालाय यात शंका नाही. भल्याभल्या वाघांची शेळी झालीये. नेत्यांपासून सामान्य जनतेपर्यंत सगळीकडे आज भेदरलेले लोक दिसतात. ईडीच्या भितीनं भलेभले गामा लाचार होऊन, विचारधारेची सुरळी करून गपगुमान या कळपातनं त्या कळपात जाऊ लागलेत. आपली लफडी-कुलंगडी बाहेर काढून, आजवर दाबलेल्या फायली ओपन केल्या तर? तिथपासून ते सामान्य माणूस देखील हादरला आहे.' 

हेही वाचा : 'ऐशवलया लाय' लहान मुलीची क्यूट हाक ऐकताच आराध्याची इनस्टंट रिएक्शन कॅमेऱ्यात कैद, पाहा VIDEO

पुढे किरण माने म्हणाले की 'ही पोस्ट केली तर मला अर्वाच्य शब्दांत ट्रोल तर करणार नाहीत ना? ती कमेंट केली तर मला मेसेंजरमध्ये धमक्या तर येणार नाहीत ना? ते विधान केले तर मला कामावरून काढून तर टाकणार नाहीत ना? या भितीनं अन्याय सहन करून मूग गिळून गप्प बसलेले लोक जागोजागी दिसत आहेत. मग स्त्रियांना विवस्त्र करुन धिंड काढलेली काळीज पिळवटणारी घटना घडूदेत किंवा बलात्कारीत मुलगी रक्तबंबाळ होऊन मदत मागत रस्त्यावरून फिरतानाचं विदारक दृश्य दिसू देत. महागाई-बेरोजगारीनं कंबरडं मोडूदेत किंवा धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी कुणा निरपराध्याची हत्या घडवून आणली जाऊदेत. मीडियसोबत सगळे चिडीचूप आहेत. केली बातमी, अन् नोकरी गेली तर? शेवटी पोटापाण्यावर आल्यावर काय करणार माणूस?'

किरण मानेंनी दिली गांधी भवनात होणाऱ्या कार्यक्रमाची माहिती 

पुढे किरण माने म्हणाले की, 'सगळीकडे फक्त भीती, भीती आणि भीतीचं साम्राज्य आहे. अशा परिस्थितीत गांधी जयंती सप्ताह साजरा करताना परिणामांची पर्वा न करता भवतालावर, सद्यस्थितीवर निर्भिडपणे बोलून ती साजरी करण्याची ही कल्पना खूप आवडली मला. यात डॉ. मणिंद्रनाथ ठाकूर, पी. साईनाथ, सुधींद्र कुलकर्णी असे अनेक मान्यवर बोलणार आहेत. पुण्यात 'गांधी भवन'मध्ये होणार्‍या या सप्ताहातल्या एका परिसंवादात बोलायला मलाही आमंत्रित केलेय.' पोस्टच्या माध्यमातून किरण माने यांनी त्यांच्या चाहत्यांना कार्यक्रमाचे आमंत्रण दिलं आहे. त्यांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.