Video : अंगावर काटा आणणाऱ्या कोकणकड्याने दृढ केली त्यांची मैत्री....

#नुसता_थरार.... पाहा हा व्हिडिओ.... 

Updated: Mar 1, 2020, 11:14 AM IST
Video : अंगावर काटा आणणाऱ्या कोकणकड्याने दृढ केली त्यांची मैत्री....  title=
व्हिडिओ सौजन्य- Shivam Aher/ युट्यूब

मुंबई : 'ये दोस्ती हम नही तोडेंगे' हे गाणं म्हटलं की यारी- दोस्तीच्या आणाभाका घेणारे मित्रमंडळी डोळ्यांसमोर येतात. सहलीला जाताना असो, किंवा मग एखाद्या सोशल मीडिया पोस्टमध्ये असो. ही ओळ अनेकदा वापरली जातेच. पण, कधी एखाद्या डोंगराच्या कड्यावर किंवा एखाद्या सुळक्यावर मित्राच्या साथीने हे गाणं म्हणण्याचा अनुभव तुम्ही घेतला आहे का? 

अनुभव म्हणण्यापेक्षा या थराराला कधी तुम्ही सामोरं गेला आहात का? हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे, एक अशी जोडगोळी ज्यांनी त्यांच्या जिद्दीच्या बळावर भल्याभल्यांना घाम फोडणाऱ्या कोकणकड्याची चढाई करण्याचा निर्धार केला होता.

हरिश्चंद्रगडाच्या ट्रेकमधील सर्वात मोठं आकर्षण असणाऱ्या हजारो फुंट उंच अशा कोकणकड्याच्या चढाईचा हाच थरार आणि मैत्रीच्या नात्याचा अनोखा बंध 'कोकणकडा- अ ड्रीम क्लाईंब' या बहुप्रतिक्षित व्हिडिओच्या ट्रेलरमधून पाहता य़ेत आहे. बाह्यगोल आकाराच्या या कड्याकडे पाहूनच अनेकांचा थरकाप उडतो. पण, हाच कडा कोणासाठीतरी आयुष्यभराचं स्वप्नही असू शकतो हे या व्हिडिओतून पाहता येतं. 

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या जवळपास पाच मिनिटांच्या ट्रेलरमध्ये भावना, जिद्द, मैत्रीचं नातं, विश्वास आणि निसर्गाची किमया पाहायला मिळत आहे. टप्प्याटप्प्यावर येणारी आव्हानं, कुटुंबीयांचा विश्वास, त्यांच्या मनात असणारी भीती या साऱ्यापुढे उभा असणारा हा विस्तीर्ण कडा, याची झलक व्हिडिओत पाहता येते. याचविषयी माहिती देत २००७मध्ये पहिल्यांदाच कोकणकड्याला भेट देणाऱ्या रोहित वर्तक या स्लॅकलायनर आणि रॉक क्लायंबरने या कड्यावरुन खाली पाहिलं तेव्हा इतकी खोली आपण आतापर्यंतच्या आयुष्यात कधीच न पाहिल्याची अवाक करणारी भावना त्याने व्यक्त केली. 

पाहा : खरीखुरी तारेवरची कसरत करणारा मराठमोळा अवलिया...

 

कोकणकड्याकडे पाहून भीती वाटली तरीही त्यावर चढाई करायचीच, असा निर्धार त्याने केला. यामध्ये त्याला साथ मिळाली ती म्हणजे गणेश गीध (डेला ऍडव्हेंचरमध्ये मॅनेजरपदी असणाऱ्या) या तितक्याच ध्येयवेड्या मित्राची, एका विश्वासार्ह साथीदाराची. हजारो फुटांचा वक्र दग़डी भाग, त्यातून घोंगावणारा वारा, सूर्याचा दाह आणि कड्यावरुन  खाली पाहताच दिसणारी खोली अशा परिस्थितीतही गणेश आणि रोहित या दोघांनी त्यांच्या संपूर्ण टीमच्या साथीने, शिवदुर्ग मित्र लोणावळा यांच्या साथीने या स्वप्नवत चढाईच्या दिशेने पावलं उचलली. 

कोकणकडा चढण्यासाठीचे त्यांचे पहिले दोन प्रयत्न अपयशी ठरले. मानसिकदृष्ट्या ही बाब त्यांना खचवणारी होती. पण, त्यांचा विश्वास टीकून होता तो अनेकांच्या विश्वास आणि अपेक्षांवर. गणेश आणि रोहित यांच्या मैत्रीचे बंध कोकणकड्याच्या खडकाप्रमाणेच आणखी कणखर आणि भक्कम झाले. पण, या प्रवासात एका टप्प्यावर जातात गणेशने या चढाईतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. तो क्षण, अनेकांना धक्का देणारा होता. गणेश आणि रोहितचं हे स्वप्न आता एका रोपट्यापासून वटवृक्षाप्रमाणे विस्तारलं होतं. त्याच्याशी अनेकजण जोडले गेले होते. 

निसर्ग त्याच्या लीला दर दिवसाआड दाखवत होताच. पण, यामध्ये कोकणकड्याने मात्र या मित्रांच्या जोडगोळीला आपलंसं केलं. पाहता पाहता ते या स्वप्नानजीक पोहोचू लागले आणि पुढे...... पुढे काय झालं, ते कुठवर पोहोचले, त्यांचा हा प्रवास नेमका कसा होता याचा उलगडा अवघ्या काही दिवसंमध्ये होणार आहे. तोवर आयुष्याचा मनमुराद आनंद घेता घेता निसर्गाच्या अगाध लीलांपैकी एक असणाऱ्या या कोकणकड्यापुढे एकदा उभे राहून आपण किती लहान आहोत हे एकदा पाहाच.