मुंबई : देशात कोरोना या एका अदृश्य विषाणूने भयंकर रूप घेतलं आहे. रोज लाखो लोकांना कोरोना व्हायरसची लागण होत आहे, तर दुसरीकडे मृतांच्या संख्येत तुफान वाढत आहे. अशा महामारीच्या परिस्थितीत माणुसकी मात्र नष्ट होताना दिसत आहे. सर्वत्र भीतीदायक वातावरण आहे. अत्यावश्यक असलेल्या गोष्टींचा काळाबाजार सुरू आहे. रूग्णांना ऑक्सिजनची कमतरता. सर्व गोष्टींचा तुटवडा असल्यामुळे सर्वत्र मृत्यूचं थैमान. परिस्थिती अत्यंत वाईट आहे. या सर्व गोष्टींचे संकेत तर अभिनेते दिलीप कुमार यांनी फार पुर्वी दिले होते.
कॉमेडियन कुणाल कामराने अभिनेते दिलीप कुमार यांचा एक व्हीडिओ शेअर केला आहे. व्हीडिओ ब्लॅक अण्ड व्हाईट असला तरी आजच्या रंगीबेरंगी जगात सुरू असणारा काळा बाजार या व्हीडिओमध्ये दिसत आहे. व्हीडिओमध्ये दिलीप कुमार म्हणत आहेत, की 'लोकं भूकेने मरत होते, तेव्हा आपण अन्न जास्त किंमतीत विक्री करून आपले खिशे भरत होतो.'
ते पुढे म्हणतात, 'शहरात आजार पसरला तेव्हा आपण औषधं चोरली ती जास्त किंमतीत विकली आणि जेव्हा पोलीस चौकशीसाठी आले तेव्हा लोकांचा प्राण वाचवणारी औषधं आपण नाल्यांमध्ये फेकली. माणसाचा ठेवा वेळेवर त्याच्या कामी येवू दिला नाही. .. '
कुणाल कामराने हा व्हीडिओ अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केला आहे. फेसबुकवर हा व्हीडिओ शेअर करत कुणाल कामराने कॅप्शनमध्ये 'माणुसकी नष्ट होत आहे...' असं लिहिलं आहे.