रिमिक्समध्ये कसली आली क्रिएटिव्हीटी? आतिफ अस्लमवर लतादीदींची टीका

'चलते चलते' रिमिक्सवर लतादीदींची टीका

Updated: Sep 3, 2018, 06:09 PM IST
 रिमिक्समध्ये कसली आली क्रिएटिव्हीटी? आतिफ अस्लमवर लतादीदींची टीका title=

मुंबई: बॉलीवूडच्या आगामी 'मित्रो' या चित्रपटातील 'चलते चलते' या गाण्यावरुन वादाला तोंड फुटले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील मैलाचा दगड मानल्या जाणाऱ्या 'पाकीजा' या चित्रपटासाठी गुलाम मोहम्मद यांनी संगीतबद्ध केलेले 'चलते चलते' हे गाणे लता मंगेशकरांनी आपल्या आवाजाने अजराअमर करुन ठेवले होते. मात्र, आता 'मित्रो' या चित्रपटासाठी पाकिस्तानी गायक आतिफ अस्लम याने या गाण्याला रिमिक्स टच दिला आहे. याविषयी लता मंगेशकर यांनी नाराजी व्यक्त केली. 
 
 मला हे गाणेही ऐकण्याची इच्छा नाही. मात्र, गाण्यांच्या रिमिक्सचा हा ट्रेंड पाहून मला खूप वाईट वाटते. जुन्या अजराअमर गाण्यांच्या चाली बदलण्यात कसली सर्जनशीलता आहे? या गाण्यांच्या चाली आणि शब्द बदलण्याचे अधिकार तुम्हाला कोणी दिले, असा सवाल लता मंगेशकरांनी विचारला. 
 
आतिफ अस्लमने  'चलते चलते' या मूळ गाण्यात बरेच बदल केले आहेत. 'चलते चलते यु ही कोई मिल गया था' या ओळींचा अपवाद वगळता गाण्यातील शब्दही बदलण्यात आले आहेत. धक्कादायक गोष्ट म्हणजे संगीतकार म्हणून तनिष्क बागची यांना श्रेय देण्यात आले आहे. त्यामुळे या रिमिक्स व्हर्जनवर आतापर्यंत अनेकांनी टीका केली आहे. 

लता मंगेशकर यांनीही हाच धागा पकडत गाण्यातील मूळ शब्द आणि चालीशी छेडछाड करण्याचा हक्का तुम्हाला कोणी दिला, असा सवाल विचारला आहे.