मुंबई : बॉलिवूड म्हणजे झगमगतं जग.. ही चमचमती दुनिया प्रत्येकालाच खुणावत असते. या क्षेत्रात प्रत्येकालाच आपलं नशिब आजमावयचं असतं. अनेकदा काही जण या प्रवासात मागे राहतात. तर काही आपल्या नशिबाचे शिल्पकार ठरतात. अशाच एका शिल्पकाराची कहाणी... ज्याने फक्त स्वतःचच नाही तर आपल्यासोबत अनेक दुर्लक्षितांचं नशिब घडवलं आहे. हा कलाकार आहे कोरिओग्राफर - डिरेक्टर रेमो डिसुझा.
रेमो डिसुझा यांचं मूळ नाव रमेश गोपी. रेमो डिसुझाचा जन्म केरळमधील. गुजरातमध्ये शिक्षण घेऊन मुंबईत आपली डान्सची आवड जपण्यासाठी आला. महत्वाची बाब म्हणजे रेमो डिसुझाने डान्सचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेलं नाही. मात्र त्याने एकलव्याप्रमाणे मायकल जॅकसनची पूजा केली.
रेमोने सुरूवातीला बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केलं. मात्र हे काम करताना आपल्या वर्णामुळे त्याला अनेकदा हिटवण्यात आलं. अनेकदा त्याच्या लूकमुळे उत्तम डान्स करूनही मागे टाकण्यात आलं. यानंतर कोरिओग्राफर अहमद खानने रेमोला असिस्ट करण्यास सांगितलं. आणि तेथूनच रेमोच्या करिअरची सुरूवात झाली.
रेमोने आज बॉलिवूडमध्ये स्वतःच वेगळं स्थान निर्माण केलं. रेमो फक्त कोरिओग्राफर म्हणून नाही तर दिग्दर्शक म्हणूनही लोकप्रिय ठरला. एबीसीडी या सिनेमाचं दिग्दर्शन रेमोने केलं. एवढंच नव्हे तर नृत्यामधील दुर्लक्षित लोकांना रेमोने स्वतःच वेगळं स्थान मिळवून दिलं. 'डान्स प्लस' असाच एक शो जो डान्सरसाठी हक्काचं व्यासपीठ आहे.
आपल्या नवीन उपक्रमाबद्दल बोलताना रेमो म्हणतो, “ग्लोबल डान्स अकादमी सुरू करण्याचे खूप दिवसांपासूनचे स्वप्न होते आणि मला आनंद आहे की ते प्रत्यक्षात येत आहे. आपल्या देशात आणि जगात प्रतिभावान डान्सरची कमतरता नाही. एखाद्या डान्सरला योग्य प्रशिक्षण मिळाले तर तो आपल्या प्रतिभेने चमत्कार करू शकतो. जगभरातील फ्रँचायझींसह, मी लोकांना सांगू इच्छितो की जोपर्यंत तुमच्याकडे इच्छाशक्ती आणि उत्कटता आहे, तोपर्यंत कोणीही खरोखर चांगले नृत्य करू शकते." रेमो फ्यूजन डान्स स्टुडिओ हा चित्रपट निर्माते अवि राज, प्रेम राज सोनी, रोहित शर्मा, सी-कनेक्ट ग्लोबल, 21 ब्लेसिंग्ज आणि प्रेम राज पिक्चर्स यांच्या सहकार्याने आहे.
रेमो डिसूझा त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो. पण 11 डिसेंबर 2020 चा दिवस त्याच्यासाठी धोकादायक ठरला. मुलाखतीत रेमोने सांगितले होते की, तो दिवस सामान्य दिवसासारखा होता. मी नाश्ता केला आणि नंतर जिमला गेलो. लिझेल आणि माझा एकच ट्रेनर आहे आणि तो त्यावेळी लिझेलला ट्रेनिंग देत होता म्हणून मी माझ्या टर्नची वाट पाहत होतो. मी ट्रेड मिलकडे पळत गेलो आणि मग स्ट्रेचिंग केले. यानंतर, मी उठलो तेव्हा माझ्या छातीत दुखू लागले.
मला त्यावेळी वाटले की ऍसिडिटीचा त्रास होतो म्हणून मी पाणी प्यायले. पण वेदना अजूनही होती, म्हणून मी माझ्या प्रशिक्षकाला प्रशिक्षण रद्द करण्यास सांगितले. रेमोने पुढे सांगितले की, बाहेर आल्यानंतर त्याला खोकला येऊ लागला, त्यानंतर लिझेलने स्मार्ट घड्याळात तपासणी केली असता, त्याच्या हृदयाचे ठोके अस्थिर होते. यानंतर लिझेल रेमोसोबत हॉस्पिटलमध्ये पोहोचली आणि डॉक्टरांनी सांगितले की त्याला हृदयविकाराचा मोठा झटका आला आहे. मात्र, नंतर उपचार करून तो सुखरूप घरी परतला.