मुंबई : बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित अखेर मराठी सिनेमात अभिनय करण्यासाठी सज्ज झाली आहे. हिंदी सिनेसृष्टी गाजवल्यानंतर माधुरी लवकरच मराठी पडद्यावर झळकणार आहे. त्यामुळे तिची ही मराठी सिनेमाची इनिंग कशी ठरणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
ब्लू मस्टँग क्रिएशन्स आणि दार मोशन पिक्चर्स यांची निर्मिती असलेल्या मराठी सिनेमात माधुरी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तेजस देऊस्कर याच्याकडे दिग्दर्शनाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दिवाळीनंतर सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात होईल, अशी माहित आहे. ही कथा तेजस त्यांनी आणि धनश्री शिवडेकर यांनी मिळून लिहिली आहे.
या चित्रपटाविषयी माधुरी सांगते, ‘प्रत्येक घरात घडणारी गोष्ट प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची कथा तुम्हाला केवळ आशा देणार नाही तर या कथेतून तुम्हाला एक प्रेरणा देखील मिळणार आहे. आयुष्य खऱ्या अर्थाने कसे जगायचे हे हा चित्रपट प्रेक्षकांना शिकवणार आहे. मराठी चित्रपट करण्याची माझी अनेक वर्षांपासूनची इच्छा होती. मी गेल्या काही वर्षांत अनेक पटकथा देखील वाचल्या आहेत. पण कोणतीच पटकथा मला तितक्या आवडल्या नव्हत्या. पण ही पटकथा वाचल्यावर काहीच क्षणात मला हा चित्रपट करायचाच आहे हा निर्णय मी घेतला. या चित्रपटाची टीम खूपच चांगली आहे’.
या सिनेमाचं नाव अद्याप जाहीर केलेलं नाही. “मराठी ही माझी मायभूमी आहे. या सिनेमातील भूमिका मला मराठीशी एकरुप होण्याची संधी देईल,” अशी प्रतिक्रिया माधुरी दीक्षितने व्यक्त केली आहे. याआधी मराठी सिनेमाची निर्मिती करणार असल्याची घोषणा माधुरीने केली होती. हा सिनेमा स्वप्निल जयकर दिग्दर्शित करणार असून तो २०१८ मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.