क्रांती रेडकरला जीवे मारण्याची धमकी, मुख्यमंत्र्यांकडे केली तक्रार

क्रांतीने तिच्या अधिकृत ट्विटरवरुन ट्वीट करत या घटनेबद्दल भाष्य केले आहे. यावेळी तिने गोरेगाव पोलिसात तक्रार दाखल केली असून याप्रकरणी लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणीही केली आहे. 

Updated: Mar 8, 2024, 10:30 PM IST
क्रांती रेडकरला जीवे मारण्याची धमकी, मुख्यमंत्र्यांकडे केली तक्रार title=

Kranti Redkar Gets Death Threats एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे हे कायमच विविध कारणांनी चर्चेत असतात. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामुळे ते प्रसिद्धीझोतात आलं. समीर वानखेडे यांची पत्नी आणि मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरला जीवे मारण्याची धमकी आली आहे. क्रांतीने तिच्या अधिकृत ट्विटरवरुन ट्वीट करत या घटनेबद्दल भाष्य केले आहे. यावेळी तिने गोरेगाव पोलिसात तक्रार दाखल केली असून याप्रकरणी लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणीही केली आहे. 

मुख्यमंत्र्यांसह मुंबई पोलिसांकडे केली तक्रार

क्रांती रेडकरने काही तासांपूर्वी तिच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन एक ट्वीट केले आहे. त्यात तिने काही स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. यात तिला काही इंटरनॅशनल नंबरवरुन सतत फोन येत असल्याचे दिसत आहे. या फोटोला कॅप्शन देताना तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला आहे. क्रांतीने या ट्वीटमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, मुंबई पोलीस यांनाही टॅग केले आहे. 

"माझ्या मोबाईल नंबरवर विविध पाकिस्तानी नंबर आणि ब्रिटनमधून फोन येत आहे. त्यात मला जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या जात आहेत. मला फक्त हे तुमच्या निदर्शनास आणून द्यायचे आहे. गेल्या एक वर्षापासून हे सातत्याने होत आहे. याबद्दल पोलिसांना वेळोवेळी कळवण्यात आले आहे", असे क्रांती रेडकरने म्हटले आहे. क्रांती सध्या तिच्या या ट्वीटमुळे चर्चेत आली आहे.  

क्रांती रेडकरने तक्रारीत काय म्हटलंय?

क्रांती रेडकरने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, तिला 6 मार्चला +441792988111 या ब्रिटनमधील नंबरवरुन फोन आला होता. यावेळी तिला शिवीगाळ करण्यात आली. त्याबरोबर तिला आणि तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर त्याच दिवशी सकाळी 11 च्या सुमारास +923365708492 क्रमांकावरून व्हॉट्सअॅपवर एका मेसेजद्वारे धमकी देण्यात आली, असे तिने म्हटले आहे. 

पाकिस्तानी नंबरवरुन फोन येणे आणि अशाप्रकारे धमकी दिली जाणे हा गंभीर प्रकार आहे. एक महिला म्हणून मला याबद्दल प्रचंड चिंता वाटत आहे. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने तपास करावा, अशी विनंती क्रांतीने केली आहे. दरम्यान याबद्दल झोन-11 चे पोलिस उपायुक्त आनंद भोईत यांनी “आम्हाला एक अर्ज मिळाला आहे. आम्ही त्याची चौकशी करु आणि त्यानंतर पुढील कारवाई करू.” अशी प्रतिक्रिया दिली आहे.