Marathi Actress : मराठीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून अतिशा नाईक यांना ओळखतात. अतिशा यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात ही बालकलाकार म्हणून केली होती. 8 वर्षांच्या असताना अतिशा यांनी गुड बाय या नाटकातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. दर्जेदार अभिनयानं त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. स्पष्ट वक्तव्यासाठी देखील त्या चर्चेत असतात. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अतिशा यांनी त्यांच्या खासगी आयुष्यापासून त्यांच्या करिअरपर्यंतच्या अनेक गोष्टींवर चर्चा केली आहे. यावेळी मासिक पाळीवर बोलत असताना त्यांनी याविषयी सगळ्यात आधी त्यांच्या वडिलांना सांगितल्याचे म्हटले.
अतिशा नाईक यांनी इट्स मज्जाला दिलेल्या मुलाखतीत मासिक पाळीविषयी सांगितलं आहे. यावेळी अतिशा नाईक म्हणाल्या की मी सगळ्या गोष्टींसाठी माझ्या बाबांवर पूर्णपणे अवलंबून होते. अगदी कोणतीही गोष्ट सांगायची असली तरीही ती अगोदर जाऊन मी त्यांना सांगायचे. कारण त्यांनी नेहमी मला समजून घेतलं. त्यांनी मला कधीही जज केलं नाही. त्यामुळेच मला माझी जेव्हा पहिली मासिक पाळी आली तेव्हा त्याबद्दल मी सगळ्यात आधी त्यांना सांगितलं. मी त्यावेळी खूप घाबरले होते. मला समजत नव्हतं मी काय करावं? मला कळेना नेमकं काय झालं आहे? काय करायचं मी? त्यावेळी ही गोष्ट मी बाबांना सांगितली. कारण त्यांच्याबरोबरचं माझं नातं हे खूप घट्ट होतं.'
पुढे या विषयी सांगताना अतिशा नाईक म्हणाल्या की 'जसं मी सांगितलं की मी घाबरले कारण मला याविषयी कोणतीही कल्पना नव्हती. यालाच मासिक पाळी किंवा पिरिएड्स म्हणतात याची मला कल्पना नव्हती. कारण त्यावेळी आम्हाला या विषयी काहीही सांगितलं नव्हतं किंवा शिक्षण दिलं नव्हतं. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे आता या गोष्टी शिकवल्या जातात.'
हेही वाचा : वडील रवींद्र महाजनींच्या निधानाचं कारण सांगताना गश्मीर म्हणाला, 'मी त्यांच्या समोर असलो असतो तरी...'
वडिलांना मासिक पाळीविषयी सांगण्यावर पुढे अतिशा म्हणाल्या, 'मी बाबांना सांगितल्यावर बाबा म्हणाले की, 'हे असंच होतं. पण मी याबद्दल तुला जास्त काही सांगू शकणार नाही. तुझी आई तुला सगळं नीट सांगेल.' त्यांनी मला हे सांगणं हे योग्य किंवा साहजिक होतं. पण मी सगळ्यात आधी ही गोष्ट त्यांना जाऊन सांगणं त्यासाठी जो विश्वास लागतो तो आमच्यात होता. हाच विश्वास सगळ्याच नात्यात असणं महत्त्वाचं आहे. मग ते आई-वडिलांसोबत असो किंवा मग भाऊ-बहीण किंवा मग मित्र-मैत्रिण पती-पत्नी ते अगदी शेजाऱ्यांबरोबर सुद्धा... त्या सगळ्यांसोबत विश्वासाचं नातं असणं खूप महत्त्वाचं असतं.'