World Cup 2019 : भारत- बांगलादेश सामन्यात ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीची हजेरी

पाहा ती अभिनेत्री आहे तरी कोण... 

Updated: Jul 3, 2019, 11:27 AM IST
World Cup 2019 : भारत- बांगलादेश सामन्यात ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीची हजेरी

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाने यंदाच्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत ध़डक मारली. त्यानंतर सर्वत्र या संघावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला. बांगलादेशच्या संघावर २८ धावांनी मात करत भारताच्या खेळाडूंनी मंगळवारी पार पडलेला सामना खिशात टाकला. हा सामना बऱ्याच कारणांनी गाजला. अगदी सुपरहिट आजी असो किंवा मग बांगलादेशचा शेवटचा गडी बाद करण्यासाठी जसप्रीत बुमराहने टाकलेला अफलातून चेंडू असुदे. 

अशा य़ा सुपरहिट सामन्याला प्रेक्षकांमध्ये एका मराठमोळ्या चेहऱ्याचीही झलक दिसली. महेंद्रसिंह धोनी बाद झाल्यानंतर ज्यावेळी प्रेक्षकांमध्ये कॅमेरा फिरवण्यात आला तो चेहरा नजरेस आला. सर्वसामान्य क्रीडारसिक धोनी बाद झाल्यावर नेमके कसे व्यक्त होतात, अगदी त्याच प्रकारे तीसुद्धा व्यक्त झाली होती. 

भारताच्या संघाला सातासमुद्रापार पाठिंबा देण्यासाठी गेलेला हा चेहरा म्हणजे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचा. बकुळा नामदेव घोटाळे फेम सोनाली टीव्हीवर दिसताच चाहत्यांमध्ये एक वेगळ्याच प्रकारचा आनंद पाहायला मिळाला. 

सामन्याच्या शेवटी भारताच्या क्रिकेट संघाने विजय मिळवल्यानंतर सोनालीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये ती अतिशय आनंदात दिसत आहे. किंबहुना फोटोच्या कॅप्शनमधूनही हेच प्रतित होत आहे. तिच्या आनंदाला उधाण येणं अगदीच स्वाभाविक होतं, कारण भारतीय संघाचं हे यश खऱ्या अर्थाने महत्त्वाचं होतं. येत्या काळात आता संघाच्या कामगिरीत असंच सातत्य राखत विश्वविजेतेपद मिळवण्यात भारताच्या संघाला यश य़ेणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.