Titeeksha Tawde On her First Salary : मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून तितिक्षा तावडेला ओळखले जाते. तितिक्षा तावडे ही सध्या सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आहे. या मालिकेत तिने नेत्रा हे पात्र साकारले आहे. आता नुकतंच तितिक्षा तावडेने तिच्या पहिल्या पगाराबद्दल खुलासा केला आहे. यावेळी तिने त्या पगारात काय केलं होतं, याचीही माहिती सांगितली.
प्रत्येक व्यक्तीसाठी त्याची पहिली कमाई ही महत्त्वाची असते. एखाद्या सर्वसामान्य माणसांप्रमाणेच कलाकारांसाठी पहिला पगार हा खास असतो. आता तितिक्षा तावडेनेही तिच्या पहिल्या पगाराचा किस्सा सांगितला आहे. एका मुलाखतीवेळी तिने याबद्दल सांगितले.
"माझ्या आयुष्यातील पहिली कमाई माझं स्टायपेंड होते. हॉटेल मॅनेजमेंटच्या दुसऱ्या वर्षी केलेल्या अभ्याक्रमावेळी मला 1000 दर महिना स्टायपेंड मिळाले. जवळपास 6 महिने या स्टायपेंडचे 6000 मी जमा केले होते. यानंतर मी ते जाऊन माझे हेअर स्ट्रेट केले. त्यावेळी माझी ती गरज होती आणि मला त्यासाठी आई-बाबांचे पैसे वापरायचे नव्हते", असे तितिक्षा तावडेने म्हटले.
"माझा कोर्स पूर्ण झाल्यानंतर एका प्रसिद्ध फूड चैनच्या आऊटलेटसाठी ट्रेनी म्हणून काम केलं होतं. तेव्हा माझा पगार 11 हजार 500 रुपये होता. हा पगार मिळाल्यानंतर मी आई-बाबा आणि ताईसाठी कपड्यांची खरेदी केली होती. मला गिफ्ट्स घ्यायला खूप आवडतात. त्यामुळे मी पण खूप आनंदात होते", असा किस्सा तितिक्षा तावडेने सांगितला.
दरम्यान अभिनेत्री तितिक्षा तावडे ही झी मराठीवरील 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत काम करत आहे. यासोबतच तिने 'सुंदरा मनामध्ये भरली', 'तु अशी जवळी रहा', 'सरस्वती' अशा मालिकांमध्ये काम केले आहे. याशिवाय तिने 'शाब्बास मिथू' या हिंदी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.