मुंबई : लोकप्रियतेच्या शिखरावर प्रेक्षकांच्या मनात घर करणारी, किंबहुना त्यांच्या मनात प्रश्चांचा काहूर माजवणारी मालिका म्हणजे 'रात्रीस खेळ चाले २'. मालिकेच्या पहिल्या पर्वाला प्रचंड लोकप्रियता मिळाल्यानंतर आता दुसऱ्या पर्वानेही प्रेक्षकांवर चांगलीच पकड मिळवली आहे. अतिशय रंजक अशा वळणावर असणाऱ्या याच मालिकेवर आता दु:खाचं सावट आलं आहे.
मालिकेमध्ये 'शेवंता' हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने एक पोस्ट शेअर करत या मालिकेसाठी काम करणाऱ्या एका खास स्प़ॉटबॉयच्या निधनाची माहिती दिली. मालिकेसाठी सातत्याने काम करणाऱ्या काही व्यक्तींपैकी एक असणाऱ्या ओमबीर सिंह यांच्या निधनामुळे अपूर्वाने दु:ख व्यक्त केलं.
हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झाल्याची माहिती तिने या पोस्टच्या माध्यमातून दिली. सिंह यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबीयांची जबाबदारी घेण्यासाठी म्हणून मालिकेतील प्रत्येक सदस्याने आपल्या परिने त्यांना आर्थिक मदत घेण्याची जबाबदारी घेतली. शिवाय तिने इतरांनाही सिंह यांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात देण्याचं आवाहन केलं आहे.
अपूर्वाने पोस्टमध्ये लिहिलंय...
''रात्रीस खेळ चाले २ ही तुमची लाडकी मालिका , त्यातले सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्या कामाला सुरुवात व्हायची ती म्हणजे ओम भाई यांच्या हातच्या चहा आणि कॉफी ने . ओम भाई हे आमच्या सेटवर चहा कॉफी साठी स्पेशल होते. तारीख ८.२ .२०२० त्यांनी नेहमी प्रमाणे संध्याकाळी ४वाजता चहा कॉफी दिली.आणि अचानक छातीत दुखायला लागले म्हणून आम्ही त्यांना दवाखान्यात नेलं आणि उपचार सुरू असताना त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि ते निधन पावले.
रात्रीस खेळ चाले १ आणि २ या दोन्ही मालिकेतल्या सर्व टिमला त्यांनी तरोताजा केले.म्हणुन आम्हा सर्वांना त्यांची उणीव कायम भासत राहील.त्याच्या पश्चात पत्नी , ३ मुली आणि १मुलगा असा परिवार आहे. म्हणून त्यांच्या लहान मुलांची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या पत्नीवर येऊ नये यासाठी, आमच्या 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेच्या टीमने असा विचार केला की कोणाला शक्य होईल तेवढा निधी आपण ओम भाई यांच्या परिवारासाठी जमा करु. आपणांस सांगु इच्छिते की तुम्हाला जर काही निधी द्यायचा असेल तर मी खाली त्यांच्या मुलीच्या अकाउंटची माहिती दिली आहे.आम्हाला माहिती आहे तुम्ही अवश्य मदत कराल. धन्यवाद.''
अपूर्वाची ही पोस्ट वाचल्यानंतर अनेक फॉलोअर्सनी त्यांच्या मालिकेतील ओमबीर सिंह यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं. काहींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. तर काहीनी मदतीचा हात पुढे करण्याची तयारी दाखवत सामाजिक बांधिलकीचं भान दाखवून दिलं.