Met Gala 2019 : प्रियांकाच्या लूकचे मीम्स व्हायरल, नेटकरी म्हणे 'शॉक लगा'

'मीम'करणापासून क्रिकेटपटू लसिथ मलिंगाही मागे राहिलेला नाही. 

Updated: May 7, 2019, 04:40 PM IST
Met Gala 2019 : प्रियांकाच्या लूकचे मीम्स व्हायरल, नेटकरी म्हणे 'शॉक लगा'

मुंबई : सोशल मीडियापासून फॅशन विश्व आणि कलाजगतामध्ये सध्या चर्चा सुरु आहे ते म्हणजे मेट गाला २०१९ची. सेलिब्रिटींच्या मांदियाळीत पार पडलेल्या या चौकटीबाहेरील कार्यक्रमात कलाकारांची अशी काही रुपं पाहायला मिळाली जी पाहता अनेकजण थक्कच झाले. Camp: Notes on Fashion या थीमअंतर्गत यंदाच्या 'मेट गाला'मध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्राने तिच्या पतीसह हजेरी लावली. प्रियांका आणि निक रेड कार्पेटवर येताच त्यांच्या या लूकविषयी जाणून घेण्यातच साऱ्यांची उत्सुकता पाहायला मिळाली. फॅशन विश्वातून 'देसी गर्ल' प्रियांकावर या लूकसाठी कौतुकाचा वर्षाव केला. माध्यमांनीही तिच्या या लूकची प्रशंसा केली. सोशल मीडियावरही 'मेट गाला'चे पडसाद पाहायला मिळाले. 

'मेट गाला'च्या रेड कार्पेटवर येणाऱ्या प्रियांका आणि निकने ठरलेल्या थीमनुसार त्यांची वेशभूषा केली होती. प्रियांकाने Dior Haute Coutureचा चंदेरी रंगाचा गाऊन घातला होता. प्रियांकाच्या लूकशी संबंधित काही धमाल मीम्स ट्विटर, इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर पोस्ट करत या साऱ्या प्रसंगाला विनोदी वळण देण्याचा प्रयत्न केला. प्रियांकाची केशभूषा आणि त्यात असणारा मुकूट पाहता त्याचा उल्लेख एँटिना म्हणून करण्यात आला आहे. तर, एखाद्या व्यक्तीचा फेसबुकचा प्रोफाईल फोटो नेमका कसा असतो आणि त्याच व्यक्तीला आधार कार्डवर कशा प्रकारचा फोटो मिळतो, याविषयीचंही ट्विट करण्यात आलं आहे. 

'क्वांटिको गर्ल' म्हणून आंतरराष्ट्रीय कलाविश्वात प्रसिद्ध असणाऱ्या प्रियांकाच्या या लूकवर 'सेंटर शॉक', या चॉकलेटच्या जाहिरातीचा संदर्भ कोणी जोडला आहे. तर, कोणी 'शॉक लगा लगा लगा.....!', या जाहिरातीतील फोटोंची जोड देत काही मीम साकारले आहेत. या 'मीम'करणापासून क्रिकेटपटू लसिथ मलिंगाही मागे राहिलेला नाही. मलिंगाची हेअरस्टाईल आणि प्रियांकाचा मेट गाला लूक यांमध्ये बरंच साम्य असल्याचं म्हणत असेही काही फोटो मॉर्फ करण्यात आले आहेत. 

मुख्य म्हणजे 'मेट गाला'च्या प्रत्येक वर्षी विविध थीम ठरवण्यात येतात. ज्याला अनुसरून ही कलाकार मंडळी त्यांचे लूक निर्धारित करतात. यंदाच्या वर्षी अभिनेत्री दीपिका पदुकोण हीसुद्धा अशाच काहीशा वेगळ्या लूकमध्ये दिसली होती. मुख्य म्हणजे प्रियांका मेट गाला लूकमुळे ट्रोल होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीच्या दोन वर्षांमध्येही वेशभूषेमुळे तिची मोठ्या प्रमाणात खिल्ली उडवण्यात आली होती.