मुंबई: तनुश्री दत्ता हिने एका मुलाखतीत अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करत सर्वांनाच धक्का दिला होता. तनुश्रीच्या या गौप्यस्फोटानंतर अनेकांनीच मुख्य म्हणजे अनेक अभिनेत्रींनी पुढे येत त्यांच्यासोबत घडलेल्या अशा प्रसंगांविषयी वक्तव्य केलं.
कैलाश खेर, विकास बहल, रजत कपूर, चेतन भगत, आलोकनाथ यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप झाले आणि कलाविश्वात एक प्रकारचं वादळच आलं.
अनेक कलाकारांनी या मुद्द्यावर अगदी खुलेपणाने आपली मतं मांडण्यास सुरुवात करत #MeToo या मोहिमेला पाठिंबा दिला. ज्यामध्ये आता अभिनेता सैफ अली खान याच्या नावाचाही समावेश झाला आहे.
कारकिर्दीमध्ये अगदी सुरुवातीच्या काळात आपलंही शोषण झालं होतं, असा खुलासा चित्रपटसृष्टीतील नवाब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्याने केला आहे.
२५ वर्षांपूर्वी आपल्याला या साऱ्याचा सामना करावा लागला होता, असं त्याने माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. त्या प्रसंगाविषयीची चीड आणि खंत आजही मनात असल्याचंही त्याने इथे नमूद केलं.
सध्याच्या घडीला आपल्या मुद्द्याची जास्त चर्चा होऊ नये असं म्हणत सर्व लक्ष हे महिलांच्या मागण्यांवर आणि त्यांनी केलेल्या आरोपांवर केंद्रित असलं पाहिजे, असंही तो म्हणाला.
महिलांना या क्षणाला न्याय मिळणं अपेक्षित आहे आणि तो मिळालाच पाहिजे यासाठी तो आग्रही असल्याचं पाहायला मिळालं.
दरम्यान, लैंगिक शोषणाचे आरोप झालेल्यांची कृत्य ही पूर्णपणे चुकीची असून, त्या व्यक्तींसोबत काम करण्याची आपली इच्छा नसल्याचंही त्याने स्पष्ट केलं.