The Kashmir Files : गोव्यात पार पडलेल्या 53व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI 2022) इस्रायली चित्रपट निर्माते नदाव लॅपिड यांनी केलेल्या वक्तव्यावर आता माफी मागितली आहे. नदाव लॅपिड (Nadav Lapid) यांनी चित्रपट महोत्सवात प्रमुख ज्युरी म्हणून भाग घेतला होता. यावेळी लॅपिड यांनी 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद सुरु झाला होता. यानंतर आता लॅपिड यांनी माफी मागत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
द काश्मीर फाइल्स हा चित्रपट व्हल्गर आणि प्रोपोगॅंडावर आधारित असल्याचे वाटते, असे लॅपिड यांनी म्हटले होते. णीतरी खरे बोलले पाहिजे असे म्हणत लॅपिड यानंतरही आपल्या मुद्द्यावर ठाम होते. मात्र वाद वाढत असल्याचे पाहून त्यांनी माफी मागितली आहे. मला कोणाचाही अपमान करायचा नव्हता असे नदाव लॅपिड यांनी म्हटले आहे.
लॅपिड यांनी मागितली माफी
"मला कोणाचाही अपमान करायचा नव्हता. ज्यांनी त्या परिस्थितीचा सामना केला, त्या लोकांचा आणि त्यांच्या नातेवाईकांचा अपमान करण्याचा माझा हेतू कधीच नव्हता. जर त्यांना असे वाटले असेल तर मी त्यांची माफी मागतो," असे लॅपिड यांनी सीएनएन न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे. माझ्यासोबत उपस्थित असलेल्या इतर ज्यूरींचेही हेच मत होते असे लॅपिड यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले होते लॅपिड?
"द काश्मीर फाइल्स पाहिल्यानंतर आम्ही सगळेच अस्वस्थ झालो होतो. हा चित्रपट व्हल्गर आणि प्रोपोगॅंडावर आधारित असल्याचे वाटते. एवढ्या मोठ्या चित्रपट महोत्सवासाठी हा चित्रपट योग्य नाही. मी माझ्या भावना उघडपणे सगळ्यांसमोर मांडत आहे कारण या कार्यक्रमात आपण टीका स्वीकारतो आणि त्यात नक्की काय चूकीचं आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. 'द काश्मीर फाइल्स' मुळे सगळ्यांना धक्का बसला होता," असे लॅपिड यांनी म्हटले होते.