मुंबई : Malayalam actor Priya Prakash Varrier मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर हे नाव आज कोणासाठीही नवं नाही. २०१८ या वर्षाच्या सुरुवातीला एका व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून प्रिया 'ब्लिंकिंग गर्ल' म्हणून सर्वांसमोर आली. पाहता पाहता सोशल मीडियावर 'ओरु अदार लव्ह' या चित्रपटातील 'माणिक्य मलरया पूवी' या गाण्याचा एक लहानसा व्हिडिओ असाकाही प्रसिद्धीझोतात आला की, खऱ्या अर्थाने प्रियाने रातोरात नशीब बदलण्याचाच अनुभव घेतला.
खुद्द प्रियाही ही बाब नाकारत नाही. तिने नुकतच 'बॉम्बे टाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीत या यशाविषयी काही गोष्टी स्पष्ट केल्या. या गाण्याचा काही भाग प्रदर्शित होताच प्रियाने त्याची लिंक मिळवत ती आपल्या मित्रांमध्ये शेअर केली आणि नेहमीप्रमाणे झोपी गेली. दुसऱ्या दिवशी जे काही झालं ते मात्र प्रियासाठी अनपेक्षित होतं.
'मी सकाळी उठले, तेव्हा फोन पाहिला. त्यावर अनेकांचे फोन , मेसेज वगैरे आले होते. वर्तमानपत्र, वृत्तवाहिन्या इथे सगळीकडेच चर्चा सुरु होती मी इंटरनेट सेंसेशन झाल्याची. मी तेव्हा इन्स्टाग्राम अकाऊंट सुरु केलं. खरंतर ते आधी प्रायव्हेट होतं, पण गाणं प्रदर्शित होण्यापूर्वी मी ते पब्लिक केलं होतं. तिथे एक हजारहून फॉलोअर्सचा आकडा थेट १५ हजारांवर पोहोचला', असं प्रिया म्हणाली.
विराट कोहलीच्या आलिशान हॉटेलमध्ये मिळतात अफलातून पदार्थ
सोशल मीडियावर अकाऊंट स्वत:पुरता सीमीत असताना आपण, त्यावर काहीही पोस्ट करत असल्याचं तिने सांगितलं. पण, अकाऊंट सर्वांना पाहता येण्यासारखं करताच या पोस्टवर काही निर्बंध आल्याची बाबही तिने स्वीकारली. अनेकदा सोशल मीडियावर अमुक एक गोष्ट शेअर केल्यानंतर त्यावर येणाऱ्या प्रतिक्रियांचा सामनाही याच सेलिब्रिटी मंडळींना करावा लागतो. ज्यामध्ये कित्येकदा त्यांची खिल्लीही उडवण्यात येते. त्याचविषयी सांगताना प्रिया म्हणाली, 'माझी अनेकदा खिल्ली उडवली गेली आहे. पण, कित्येकदा माझ्यावरील विनोद, मीम्स वगैरे पाहून मलाही ते भावल्यास मीसुद्धा ते शेअर करते. अर्थात त्यातील काहींमुळे आम्ही दुखावलेही जातो. मी दुखावली जाते. पण, तरीही ठीक आहे. मला आता या साऱ्याची सवय झाली आहे. अनेकदा तर माझी खिल्ली उडवली गेली नाही, तर लोकं माझी खिल्ली का उडवत नाही आहेत, असा प्रश्नही मला पडतो', असं प्रिया म्हणाली.
एक सेलिब्रिटी म्हणून वावरत असताना प्रत्येक वेळी तुमची प्रशंसा होईलच असं नाही. कित्येकदा टीकेचा सामना करावा लागतो त्याचप्रमाणे खिल्ली उडवली जाण्याचं प्रमाणही वाढतं. पण, तुम्ही या सर्व गोष्टी कशा प्रकारे हाताळता हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असतं. सध्याच्या घडीला सोशल मीडियावर नेमकं कसं वावरावं आणि तेथील गोष्टींकडे किती गांभीर्याने पाहावं हे प्रियाला चांगलंच जमल्याचं दिसत आहे.