Coronavirus : राम गोपाल वर्माकडून कोरोनाची थट्टा

कोरोनाने संपूर्ण जगात थैमान मांडल आहे 

Updated: Apr 2, 2020, 09:31 AM IST
Coronavirus : राम गोपाल वर्माकडून कोरोनाची थट्टा

मुंबई : संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसची भीती पसरली आहे. हळहळू हा व्हायरस देशातील सगळ्या राज्यात प्रवेश करत आहे. देशभरात बुधवारी नवे ४५० लोकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. आतापर्यंत हा आकडा १९००च्या घरात पोहोचला आहे. आतापर्यंत ५९ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशा सगळ्या परिस्थितीत दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांने केलेलं ट्विट हे परिस्थितीची थट्टा करणारं आहे. 

बुधवारी 'एप्रिल फूल' या एक एप्रिल तारखेची संधी साधत राम गोपाल वर्मा याने एक ट्विट केलं. या ट्विटमधून त्याने कोरोनाचं गांभीर्य बाजूला सारत थट्टा करण्यात आली. त्याने काल दिवसभरात तीन ट्विट केले आहेत. पहिल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे की,'माझ्या डॉक्टरांनी मला कोरोनाची लागण झाल्याचं सांगितलं आहे.' असं ट्विट केलं आहे. 

तर दुसऱ्या ट्विटमध्ये माफी मागितली आहे. पण ही चूक माझी नाही तर डॉक्टरची असल्याचं म्हणतं खिल्ली उडवली आहे. या ट्विटमध्ये म्हटलं आहे की,'निराशा केली असेल तर माफ करा. मला डॉक्टरांनी हा एप्रिल फूल जोक सांगितला. यात माझी चुकी नाही... त्यांचीच चूक' असं म्हणतं त्याने ही गोष्ट मस्करीत केली आहे. 

आपल्याला माहितच आहे सध्या अत्यावश्यक सेवांमध्ये डॉक्टर आपली खूप महत्वाची जबाबदारी बजावत आहेत. डॉक्टर आणि पोलीस दिवसरात्र नागरिकांसाठी झटत आहेत. असं असताना डॉक्टरांबद्दल अशी थट्टा करणं राम गोपाल वर्मा यांना तरी हे शोभत नाही. 

राम गोपाल वर्मा एवढ्यावरच थांबला नाही तर आणखी एक ट्विट त्याने केलं. 'हरकत नाही, मी हे गरम, भीतीचं वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न करत होतो. मी हा जोक माझ्या स्वतःवर केलाय. जर कुणाला याचा त्रास झाला असेल तर मी माफी मागतो.' या शब्दात त्याने ट्विट केलं आहे. 

या तिन्ही ट्विटवर नेटीझन्सनी राम गोपाल वर्माला चांगल धारेवर धरलं आहे. नेटकऱ्यांनी राम गोपाल वर्मावर टीका केली आहे. यावर 'तुला असं बोलून लाज वाटत नाही का?' असा देखील सवाल करण्यात आलं आहे.