'...नाहीतर 'मुळशी पॅटर्न' 100 कोटी कमावू शकला असता'; प्रवीण तरडे यांनी व्यक्त केली होती खंत

Pravin Tarde Birthday Special: 'मुळशी पॅटर्न' हा सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट आहे. प्रवीण तरडे यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाची तुफान चर्चा रंगलेली होती. परंतु हा चित्रपट 100 कोटी का कमावू शकला नाही यामागील दोन कारणं ही प्रवीण तरडे यांनी स्पष्ट केले होते. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया ही आठवण.   

गायत्री हसबनीस | Updated: Nov 11, 2023, 07:06 PM IST
'...नाहीतर 'मुळशी पॅटर्न' 100 कोटी कमावू शकला असता'; प्रवीण तरडे यांनी व्यक्त केली होती खंत  title=
pravin tarde explains why mulshi pattern didnt cross 100 crores

Pravin Tarde on Mulshi Pattern Movie: सध्या मराठीतले अनेक सिनेमे हे कोटीच्या कोटी उड्डाणं घेताना दिसत आहेत. 2016 साली आलेला 'सैराट' हा चित्रपट 100 कोटींच्याही पुढे पोहचला होता. त्याचसोबत 'नटसम्राट', 'झिम्मा', 'मुळशी पॅटर्न', 'वेड', 'पावनखिंड', 'कट्यार काळजात घुसली', 'आणि डॉ. काशिनाथ घाणेकर', 'टाईमपास 2', 'दगडी चाळ', 'लय भारी', 'दुनियादारी' असे अनेक चित्रपट गेल्या वर्षांत बॉक्स ऑफिसवर गाजले आहेत. यावर्षी 'बाईपण भारी देवा' या चित्रपटानं सर्वाधिक कमाई करत सर्व रेकोर्ड्स मोडले आहेत.

लेखक, निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते प्रवीण तरडे यांच्या चित्रपटांचे आपण सर्वच जण फॅन्स आहोत. मागच्या वर्षी प्रदर्शित झालेला त्यांचा धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित 'धर्मवीर' या चित्रपटानंही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. आता या चित्रपटाचा नवा भाग लवकरच प्रदर्शित होणार असून या चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरूवात झाली आहे. यापुर्वी त्यांचा 'मुळशी पॅटर्न' हा चित्रपट प्रचंड गाजला होता. प्रवीण तरडे, ओम भुतकर, महेश मांजरेकर, उपेंद्र लिमये, मोहन जोशी यांच्या अभिनयानं या चित्रपटात चार चांद लावले होते. चित्रपटाला अनेक पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटानं चांगली कामगिरी केली होती. परंतु हा चित्रपट 100 कोटी क्लबमध्ये का जाऊ शकला नाही याचे कारण प्रवीण तरडे यांनी स्पष्ट केले होते. 

आज प्रवीण तरडे यांचा वाढदिवस आहे. प्रवीण तरडे यांनी अनेक मालिका, चित्रपट आणि वेबमालिकांतून कामं केली असून त्यांनी अनेक मालिका-चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आहे. काही महिन्यांपुर्वी त्यांनी 'बोल भिडू' या युट्युब चॅनलला मुलाखत दिली होती. त्यांच्या 'दिलखुलास गप्पा' कार्यक्रमात त्यांनी 'मुळशी पॅटर्न'च्या कमाईवर भाष्य केले होते. 2018 आलेल्या या चित्रपटानं अल्पावधीतच मोठी कमाई केली होती. परंतु यावर प्रवीण तरडे यांनी आपली खंत व्यक्त केली होती. 

ते म्हणाले की, ''सगळ्यांनी ‘मुळशी पॅटर्न’ पाहिला. पुरस्कारही मिळाले. डोक्यावर घेऊन नाचले. पण ज्या दिवशी चित्रपटगृहात तो खूप जोरात चालू होता त्या वेळेस खोडसाळ पत्रकारांनी उगीचच गुन्हेगारीचा चित्रपट, असं कारण नसताना रंगवलं.'' पुढे ते म्हणाले की, ''शेतकऱ्यांचा एवढा मोठा चित्रपट होता. जर 'मुळशी पॅटर्न'ला 'ए' सर्टिफिकेट दिलं नसतं आणि खोडसाळ पत्रकारांनी गुन्हेगारीचा चित्रपट म्हणून रंगवलं नसतं तर 'मुळशी पॅटर्न' हा 100 कोटी क्रॉस केलेला चित्रपट झाला असता. कारण तळागाळातल्या समाजाच्या मातीचा प्रश्न सांगणारा चित्रपट हा सुपरहिटच होतो आणि तो झालाच. खूप पैसे कमवले. पण 100 कोटींच्या क्लबमध्ये त्याची जायची ताकद होती'', अशी खंत त्यांनी व्यक्त केली होती.