नवी दिल्ली : नुकतीच मुंबईत दाखल झालेली प्रियांका चोप्रा मुंबईत काही दिवस व्यतीत केल्यानंतर शनिवारी दिल्लीत 'युनिसेफ'च्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पोहचली.
युनिसेफची ग्लोबल गुडविल अॅम्बेसेडर प्रियांका चोप्रा तरुण मुलींना आणि मुलांना जागरुक करताना तसंच त्यांच्या समस्यांवर प्रकाशझोत टाकताना दिसली. 'जितकं तुम्ही घाबराल, तेवढच लोक तुम्हाला घाबरवतील. त्यामुळे नेहमीच आपल्या अधिकारांसाठी उभं राहणं शिका' असा सल्लाही तिनं उपस्थितांना दिला.
'भारतातला प्रत्येक तरुण स्वतंत्र असावा... तो स्वप्न पाहण्यासाठी, शाळेत जाण्यासाठी, आपल्याला जे करायचंय त्यासाठी स्वतंत्र असावा आणि हेच माझं स्वप्न आहे. मला वाटतं की मुलांना मूलचं राहू द्यावं' असं यावेळी प्रियांकानं म्हटलंय.
सरकारचं 'बेटी बचाओ बेटी पढाओ' अभियान १६१ जिल्ह्यांत सुरू झालं होतं... ते आज ६४० जिल्ह्यांपर्यंत पोहचलंय, याचाही उल्लेख प्रियांकानं केला.
सिने इंडस्ट्रीबद्दल बोलताना प्रियांका म्हणाली, 'सिनेमा केवळ समाजाला आरसा दाखवण्याचा प्रयत्न करतो, परंतु, समाजाला बदलण्याचं काम बॉलिवूडचं नाही. ते आपल्या सर्वांपासून सुरू होईल. केवळ आपण आपले विचार बदलू शकतो'
प्रियांकानं मिळवलेल्या स्थानावबद्दल विचारण्याता आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना तिनं 'मी लकी आहे' असं म्हटलंय. 'माझे आई वडील दोघंही डॉक्टर होते. आमच्या हॉस्पीटलमध्ये २-३ बेड नेहमी पैशांशिवाय येणाऱ्या रुग्णांसाठी रिकामे होते. मी औषधं मोजून पुड्यात टाकण्याचं काम करत असे... माझ्या आईच्या कुटुंबानं नेहमीच शिक्षणावर लक्ष दिलं' अशा काही आठवणीही तिनं सांगितल्या.