मुंबई : 'पुष्पा- द राईज' या चित्रपटानं रीलिज झाल्यापासून अनेक विक्रम मोडले आहेत. कोणतंही प्रमोशन न करता या चित्रपटाने इतकी मोठी उंची गाठली आहे. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांनाच या चित्रपटातील गाण्यांपासून ते डायलॉग्सची भुरळ पडली आहे. सोशल मीडियावर देखील आपल्याला यासंदर्भातले व्हिडीओ पाहायला मिळतील. हा चित्रपट तेलूगू भाषेत प्रेक्षकांच्या भेटीला आला. ज्यानंतर त्याचे अनेक भाषांमध्ये डबिंग केले गेले आहे.
या चित्रपटाला इतकं मोठं करण्यामागे, त्याचे दिग्दर्शक, प्रॉडूसर, कलाकारांचा फार मोठा हात आहे. त्यांच्या मेहनतीमुळेच चित्रपट आज ही उंची गाठू शकला आहे. परंतु या सोबतच डबिंग कलाकारंची देखील यामागे फार मेहनत आहे. त्यांनी त्यांचा आवाज देऊन त्या भूमिकेला न्याय दिला आहे आणि त्या व्यक्तिरेखेला पडद्यावरती जिवंत ठेवलं आहे.
आपल्या सगळ्यांना हे तर माहित आहे. की पुष्पराज म्हणजेच अल्लू अर्जूनला मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेने आवाज दिला आहे. परंतु या व्यतिरिक्त रश्मिका, श्रीनू, कोंडा रेड्डी यांसारख्या महत्वाच्या भूमिकेला कोणी आवाज दिला हे फारत कमी लोकांना माहिती असेल. चला तर मग तुमच्या आवडत्या कलाकाराला कोणी कोणी आवाज दिला हे जाणून घेऊया.
फिल्मस्टार श्रेयस तळपदेने अल्लू अर्जुनच्या पुष्पा या पात्रासाठी आपला आवाज दिला आहे. त्याने त्याच्या आवाजाने जी काही जादू केली आहे. ज्यामुळे या चित्रपटातील पात्राचा खरा आवाज असल्यासारखेच वाटते. तसेच श्रेयसने यामध्ये स्वत:ची स्टाईल आणि मराठी भाषा देखील वापरली आहे.
अभिनेत्री रश्मिका मंदान्नाच्या श्रीवल्लीच्या पात्रासाठी व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट स्मिता रोजमेयरने आपला आवज दिला आहे.
अल्लू अर्जुनच्या मित्राच्या भूमिकेत दिसणार्या तेलुगू चित्रपट अभिनेत्याला बॉलिवूड अभिनेता साहिल वैद्यने आपला आवाज दिला आहे. शेरशाह या चित्रपटात तो सिद्धार्थ मल्होत्राच्या मित्राच्या भूमिकेतही दिसला होता.
चित्रपटात आयपीएस अधिकारी भैरोसिंग शेखावत यांची भूमिका करणारा मुख्य खलनायक फहाद फासिलच्या भूमिकेला राजेश खट्टर यांनी आपल्या आवाजाने जिवंत केले आहे.
या चित्रपटात मंगलम श्रीनूची भूमिका साकारणारा अभिनेता सुनीलला कलाकार उदय सबनीस यांना आवाज दिला आहे.
या चित्रपटात जॉली रेड्डीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता धनंजयला अभिनेता मनोज पांडेने आपला आवाज दिला आहे.
कोंडा रेड्डीची भूमिका साकारणारा अभिनेता अजय शाह याला राजेश जॉली यांनी आवाज देऊन ताकद दिली.
मंगलम श्रीनूची पत्नी दाक्षायणीची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री अनुसुय्या भारद्वाजच्या पात्राला सबिना मौसमने आपला आवाज दिला आहे.