मुंबई : अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या पायल घोषने रिचा चड्ढाची विनाअट माफी मागितली. यानंतर रिचाने मानहानीची केस मागे घेतलीय. आम्ही संगनमताने आमच्यातला वाद मिटवल्याचे रिचा चड्ढा आणि पायल घोषने मुंबई न्यायालयात सांगितले. याआधी उच्च न्यायालयाने दोन्ही अभिनेत्रींना आपापसात प्रकरण मिटवण्यासाठी दोन दिवसांचा वेळ दिला होता.
पायलने रिचाबद्दल वादग्रस्त विधान केले होते. हे विधान 'खोटे, आधारहिन, अभद्र आणि अपमानजनक' असल्याचे रिचाने सांगत पायल विरोधात मानहानीचा दावा केला होता. १.१० कोटी रुपयांचा हा दावा होता. अपमान करणे, प्रतिष्ठा धुळीस मिळवणे, विना पुरावा बोलणे, करियरमध्ये नुकसान, मानसिक त्रास आणि तणाव झाल्याचा दावा रिचाने केला. अनुराग कश्यपवर बलात्काराचा आरोप करत पायलने रिचा आणि दोन इतर महिला कलाकारांना या वादात ओढून घेतलं होतं.
पायलने मुंबई उच्च न्यायालयात माफीनामा सादर केला. रिचाबद्दल केलेले सर्व अपमानजनक विधान मागे घेत असून माफी मागत असल्याचे पायलने म्हटले. एकमेकांविरोधात कोणतीही तक्रार दाखल न करण्याच्या मुद्द्यावर दोघींनी सहमती दिली.
'अनुरागने गैरवर्तन केलं असतं तर त्याला कायदेशीर नोटीस बजावण्या ऐवजी कोर्टात घेवून गेली असती अस रिचाने आधीचं स्पष्ट केलं होत.
दरम्यान पायल घोषकडून अनुराग कश्यपविरोधात एफआयआर दाखल केली आहे. पायलने अनुरागविरोधात बलात्कार, गैरवर्तन आणि अशोभनिय कृत्य केल्याप्रकरणी कलम ३७६,३५४,३४१ आणि ३४२ अन्वये लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहेत.