रियाची कारागृहातून सुटका होताच रितेश म्हणतो...

रिया चक्रवर्ती हिला एनसीबीनं ताब्यात घेतलं होतं.

Updated: Oct 14, 2020, 02:10 PM IST
रियाची कारागृहातून सुटका होताच रितेश म्हणतो...
संग्रहित छायाचित्र

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला जोडून सुरु असणाऱ्या ड्रग्ज प्रकरणाच्या तपासाअंतर्गत अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला एनसीबीनं ताब्यात घेतलं होतं. जवळपास २७ दिवसांनंतर रियाला न्यायालयानं सशर्त जामीन मंजूर केला. ज्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी पुढं येत तिला पाठींबा दिल्याचं पाहायला मिळालं. अभिनेता रितेश देशमुखही यात मागे राहिला नाही. 

रितेशनं ट्विट करत रियाला पाठिंबा दिला. शिवाय सुशांतच्या मृत्यूच्या एक दिवस आधी रियाला त्याच्यासोबत पाहिलं होतं असा दावा करणाऱ्या शेजाऱ्यांविरोधात पाऊल उचलणाऱ्या रियाची त्यानं पाठराखणही केली. सूत्रांच्या माहितीनुसार रियानं या शेजाऱ्यांचा दावा खोटा असल्याचं म्हणत त्यांच्याविरोधात रितसर तक्रार दाखल केली आहे. 

दर दिवशी नवं वळण मिळालेल्या या प्रकरणाबाबत वृतपत्रातील एका बातमीचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत रितेशनं सत्याहून अधिक शक्तिशाली दुसरं काहीही नसतं असं म्हणत रियाचं पाठबळ वाढवलं. या ट्विटमध्ये त्यानं रियाचाही उल्लेख केला. फक्त रितेशच नव्हे तर इतरही बऱ्याच सेलिब्रिटींनी रियाची पाठराखण करत कारागृहातून तिची सुटका झाल्यानंतर तिच्या बाजूनं उभं राहात धीर दिल्याचं पाहायला मिळालं होतं. 

 

दरम्यान, एनसीबीनं रियाला ताब्यात घेतल्यानंतर सदर प्रकरणात रिया ही ड्रग्ज रॅकेटचा हिस्सा नाही, असे निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने तिला मोठा दिलासा दिला होता.