'सिम्बा'च्या यशानंतर रोहित शेट्टीनं मुंबई पोलिसांना अशी दिली मानवंदना

पहिल्या दिवसापासूनच रणवीर आणि साराच्या 'सिम्बा'नं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय

Updated: Jan 30, 2019, 01:34 PM IST
'सिम्बा'च्या यशानंतर रोहित शेट्टीनं मुंबई पोलिसांना अशी दिली मानवंदना title=

मुंबई : सिनेदिग्दर्शक रोहित शेट्टीचा 'सिम्बा' प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलाय. बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या रुपात त्याची पावतीही निर्मात्यांना मिळालीय. या सिनेमाच्या निमित्तानं रोहित शेट्टीच्या सिनेमात पहिल्यांदाच रणवीर सिंह दिसला. रणवीरचा 'सिम्बा' अवताराला त्याच्या चाहत्यांनीही उचलून धरलंय. याच सिनेमाच्या यशानं आनंदित आणि उत्साहीत झालेल्या रोहितनं नुकत्याच मुंबईत झालेल्या 'उमंग अवॉर्ड' कार्यक्रमात पोलिसांना ५१ लाख रुपयांचा मदतनिधी दिला. मंचावर पोलिसांना ५१ लाखांचा चेक सुपूर्द करताना यावेळी त्याच्यासोबत अभिनेता अजय देवगण, रणवीर सिंह आणि अक्षय कुमार हेदेखील उपस्थित होते. 

पहिल्या दिवसापासूनच रणवीर आणि साराच्या 'सिम्बा'नं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय. या सिनेमाच्या कमाईचे आकडे दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. या सिनेमानं आत्तापर्यंत केवळ भारतात २३९.६० कोटींचा आकडा पार केलाय. दरम्यान, जगभरातील कमाईचा विचार केला तर या सिनेमानं आत्तापर्यंत ४०० कोटींहून अधिक कमाई केलीय. 

रिलायन्स एन्टरटेन्मेंट, रोहित शेट्टी पिक्चर्स आणि धर्मा पोडक्शन्स निर्मित 'सिम्बा' हा सिनेमा तीनही प्रोडक्शन हाऊससाठी आत्तापर्यंतचा सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा ठरलाय. घरगुती बॉक्स ऑफिसवर 'सिम्बा' टॉप १० च्या लिस्टमध्ये दाखल झालाय. 

 

हा सिनेमा २८ डिसेंबर २०१८ रोजी प्रदर्शित झाला होता. या सिनेमात रणवीर सिंह - सारा अली खानसोबत सोनू सूद, सिद्धार्थ जाधव, आशुतोष राणा आणि अजय देवगण यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.