मुंबई : 'चक दे इंडिया' या मराठमोळ्या अभिनेत्रीने बॉलिवूडप्रमाणेच मराठीत साऱ्यांच लक्ष वेधून घेतलं. 'प्रेमाची गोष्ट' या सिनेमात ती अतुल कुलकर्णीसोबत दिसली.
आता पुन्हा एक नवा कोरा सिनेमा घेऊन ही अभिनेत्री सज्ज झाली आहे. हिंदीसोबतच मराठीतही अभिनय करणारी सागरीका ‘डाव’ या आगामी चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पुन्हा दिसणार आहे. ‘प्रेमाची गोष्ट’ या चित्रपटानंतर ‘डाव’ हा सागरीकाचा दुसरा मराठी चित्रपट आहे.
मराठी चित्रपट रसिकांना सायको किलिंगचा अनुभव देणाऱ्या ‘डाव’मध्ये सागरीकाने मुख्य भूमिका साकारली असून, आजवर साकारलेल्या व्यक्तिरेखांपेक्षा या चित्रपटातील भूमिका खूपच वेगळी आहे. इतर जॉनरच्या चित्रपटांच्या तुलनेत मराठीमध्ये थ्रीलरपटांची संख्या फार कमी असून, ‘डाव’ हा चित्रपट त्यांची उणीव नक्की भरून काढणारा असेल असे सागरिका मानते.आशयघन कथानक, अर्थपूर्ण संवादलेखन, सहजसुंदर अभिनय, प्रसंगानुरूप पार्श्वसंगीत आणि त्याला साजेसं सादरीकरण या सर्वांचा मिलाफ घडवणारा ‘डाव’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
नितीन उपाध्याय यांनी ऑडबॉल मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली ‘डाव’ची निर्मिती केली असून, कनिष्क वर्मा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या सस्पेंस-थ्रीलरपटाची कथा-पटकथा कनिष्क वर्मा यांनीच लिहिली आहे. संवाद योगेश मार्कंडे यांनी लिहिले आहेत तर मंगेश धाकडे यांचे पार्श्वसंगीत या चित्रपटाला लाभले आहे.