Sankarshan Karhade : 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातील सुत्रसंचालक आणि लोकप्रिय अभिनेता संकर्षण कऱ्हाडे हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. संकर्षणनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या करिअरच्या सुरुवातीला तो मुंबईत कसा प्रवास करायचा आणि त्यानं किती स्ट्रगल केलं या विषयी सांगितलं होतं. तर आता त्यानं मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्यानंतर त्याला कसं वाटलं होतं आणि त्याच्यावर या सगळ्याचा कसा परिणाम झाला होता हे सांगितले आहे.
संकर्षणनं नुकतीच ‘राजश्री मराठी’ला ही मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत संकर्षणनं त्याच्या अभिनयातील प्रवासाविषयी सांगितलं. याविषयी बोलताना संकर्षण म्हणाला, स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘स्वप्नांच्या पलिकडले’ या मालिकेमधून त्याला काढून टाकण्यात आलं होतं. या मालिकेचं तीन दिवस चित्रीकरण केल्यानंतर तुझं काम बरोबर नाही असं म्हणत त्याला या मालिकेमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. याविषयी संकर्षण म्हणाला, “काम देताना मला असं सांगण्यात आलं होतं की, तुझं एका दिवसाचं मानधन 1500 रुपये असणार आहे. मला ते पैसे कॅशमध्ये मिळणार होते. तीन दिवसांनी मालिकेमधून काढल्यानंतर मी त्यांच्याकडे गेलो. मी त्यांना म्हटलं की, मालिकेमधून मला काढलं आहे ते ठिक आहे. पण तीन दिवसांचं माझं 1500 रुपयांप्रमाणे 4500 रुपये मानधन द्या. तेव्हा ते मला म्हणाले, नाही नाही आपलं तर एका दिवसाचं मानधन 700 रुपये ठरलं होतं”.
हेही वाचा : असं कोण करतं? अभिनेत्यानं शेअर केला स्वत:च्याच शोकसभेचा व्हिडीओ
आपल्या हक्काचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या संकर्षणला त्यावेळी त्याला काय वाटलं हे सांगत , म्हणाला “मला त्याक्षणी खूपच वाईट वाटलं. लगेच मी तीन दिवसांच्या पैश्यांचा हिशोब केला. 2100 रुपये मला मिळणार होते. 2100 रुपये त्यांनी मला पाकिटामध्ये भरुन दिले. त्यावेळी मी त्यांना म्हटलं की, इथे सेटवर माझे खूप चांगले मित्र झाले आहेत. हे 2100 रुपये ठेवा आणि त्यामधून या सगळ्यांना कायतरी खायला द्या. ते पैसेही त्यांनी माझ्याकडून परत घेतले. तुम्ही हे पैसे का परत देत आहात? असंही त्यांनी मला एका शब्दाने विचारलं नाही. या प्रसंगानंतर मला आणखीनच रडू कोसळलं. पण मला असं वाटतं या गोष्टी घडलेल्या चांगल्या असतात. कोणीतरी तुम्हाला काढून टाकणं, अपमान करणं घडू शकतं. कारण वेदनेतूनच घडलेल्या गोष्टी मजेशीर असतात”. संकर्षणने हार न मानता त्याचा प्रवास व प्रयत्न सुरुच ठेवले हे खरंच कौतुकास्पद आहे