Satish Kaushik Death: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते सतीश कौशिक यांच्या निधनानंतर (Satish Kaushik Death) बॉलिवूडला धक्का बसला असून हळहळ व्यक्त केली जात आहे. बुधवारी रात्री ह्रदयविकाराचा झटका आल्याने सतीश कौशिक यांचं निधन झालं. दरम्यान सतीश कौशिक यांच्या मॅनेजर संतोष राय (Santosh Rai) यांनी शेवटच्या क्षणांबद्दल खुलासा केली आहे. सतीश कौशिक यांना आपली मुलगी वंशिकासाठी जगायचं होतं असं त्यांनी सांगितंल आहे.
ETimes शी बोलताना संतोष राय यांनी सांगितलं की, "सतीश कौशिक आपला 'कागज 2' चित्रपट पाहत होते. त्यांना रात्री एडिटिंग करायचं होतं. पण अचानक त्यांनी मला फोन केला आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात नेण्यास सांगितलं. मी चालक आणि सुरक्षारक्षकासह त्यांना कारमधून रुग्णालयात घेऊन निघालो होतो. पण रस्त्यात त्यांची प्रकृती आणखी खालावली. त्यांनी डोकं माझ्या खांद्यावर ठेवलं आणि म्हटलं की, संतोष मला मरायचं नाही आहे. मला वाचव".
आम्ही काही मिनिटात रुग्णालयात दाखल झालो, मात्र तरीही त्यांना वाचवू शकलो नाही अशी खंत संतोष राय यांनी व्यक्त केली आहे. रस्त्यातच त्यांची शुद्ध हरपली असं संतोष राय यांनी सांगितलं. दरम्यान रस्त्यात त्यांनी मला आपल्याला मुलीसाठी जगायचं असून, पत्नी आणि मुलीची काळजी घ्या असं सांगितल्याचा खुलासाही त्यांनी केला आहे. "मला वंशिकासाठी जगायचं आहे. शशी आणि वंशिकाची काळजी घ्या," असं ते म्हणाले होते.
संतोष राय गेल्या 34 वर्षांपासून सतीश कौशिक यांच्यासोबत होते. यावेळी त्यांनी त्यांच्या पत्नीबद्दलही सांगितलं. "सतीश कौशिक यांची प्रकृती गंभीर असल्याचं मी सांगितलं तेव्हा त्यांचा विश्वास बसत नव्हता. नंतर आपण त्यांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र अनुपम खेर यांना फोन करुन सांगितलं. अनुपम खेर आणि बोनी कपूर सतीश कौशिक यांच्या निवासस्थानी काही मिनिटात पोहोचले होते. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत ते तिथे होते," अशी माहिती संतोष राय यांनी दिली आहे.
सतीश कौशिक यांच्या निधनाबद्दल सांगितल्यानंतर त्यांच्या पत्नीला धक्का बसला होता. गोंधळलेल्या असल्याने त्या अनेक प्रश्न विचारत होत्या असं त्यांनी सांगितलं. सतीश कौशिक यांना ह्रदयाचा कोणताही त्रास नव्हता. त्यांना अस्थमा, उच्च रक्तदाब आणि डायबेटिजचा त्रास होता अशी माहिती संतोष राय यांनी दिली आहे. 9 मार्चला सतीश कौशिक यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले.