Controversy over Kriti Senon Kiss: 'आदिपुरुष' (Adipurush) चित्रपटामुळे सध्या बॉलिवूड अभिनेता प्रभास (Prabhas) आणि अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) सध्या चर्चेत आहेत. चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून प्रेक्षकांना तो प्रचंड आवडला आहे. VFX मुळे सुरुवातीला ट्रोल झालेल्या 'आदिपुरुष' चित्रपटाला आता मात्र प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. पण यादरम्यान आता क्रिती सेनन वादात अडकली आहे. मंदिराबाहेर तिने केलेला एक किस यासाठी कारणीभूत ठरला आहे. यानंतर यावरुन दोन गट पडले असून सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे.
7 जून रोजी क्रिती सेनन तिरुपतीमधील वेंकटेश्वरा मंदिरात दर्शनासाठी गेली होती. यावेळी मंदिराच्या बाहेर निरोप घेताना दिग्दर्शक ओम राऊत (Om Raut) याने क्रिती सेननला गालावर किस केल्याने हा वाद निर्माण झाला आहे. यानंतर तेलंगणाच्या चिलकूर बालाजी मंदिराच्या (Chilkur Balaji Temple) मुख्य पुजारींनी त्यांच्यावर टीका केली असून हॉटेल रुम बूक करा असा सल्ला दिला आहे.
"ही एक निषेधार्ह कृती आहे. पती आणि पत्नीही मंदिरात एकत्र जात नाहीत. तुम्ही हॉटेल रुममध्ये जाऊन हे करु शकता. तुमचं वागणं हे रामायण आणि देवी सीतेचं अपमान करणारं आहे," असं ते म्हणाले आहेत.
Tirumala, Andhra Pradesh:Pecks & flying kiss in TTD premises by Adipurush Actress Kriti Sanon and Director Om Raut.#KritiSanon #OmRaut #TirumalaTemple pic.twitter.com/S7XlCDyrKW
— rajni singh (@imrajni_singh) June 8, 2023
ओम राऊत आणि क्रिती सेननचा किस करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. भाजपाचे राज्य सचिव रमेश नायडू यांनीही यावरुन टीका केली होती. मात्र नंतर त्यांनी आपलं हे ट्वीट डिलीट केलं. मंदिरासारख्या परिसरात त्यांनी प्रसिद्धीचे हे फंडे टाळले पाहिजेत असं ते म्हणाले होते.
6 जून रोजी तिरुमला येथे 'आदिपुरुष' चित्रपटाला ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. यासाठी 'आदिपुरुष' चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. यादरम्यान, बुधवारी ओम राऊत आणि क्रिती सेनन तिरुपतीमधील वेंकटेश्वरा मंदिरात दर्शनासाठी आले होते. व्हायरल व्हिडीओत ओम राऊत मंदिराबाहेर क्रिती सेननचा निरोप घेताना गालावर किस करताना दिसत आहे. मंदिराच्या आवारात अशाप्रकारे किस केल्याने अनेकांना हे आवडलेलं नाही,
एकीकडे किसवरुन वाद सुरु असताना क्रिती सेननने इंस्टाग्रामला पोस्ट शेअर केली आहे. तिरुपती मंदिर भेटीदरम्यान मिळालेलं प्रेम आणि आपुलकीबद्दल तिने आभार मानले आहेत. चाहत्यांचे आभार मानताना क्रितीने आपलं मन सकारात्मकतेने भरलं असल्याचं म्हटलं आहे.
"आभार, माझं मन सकारात्मकतेने भरलं आहे. तिरुपतीमधील पवित्र आणि शक्तिशाली ऊर्जा; काल रिलीजआधी झालेल्या कार्यक्रमात तुम्ही सर्वांना आदिपुरुष आणि जानकीला दिलेलं प्रेम...माझ्या चेहऱ्यावर अद्यापही हास्य आहे," असं क्रिती सेननने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, मंदिराबाहेर आल्यानंतर ओम राऊतने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं होतं की, "मंदिरात आल्यानंतर मला फारच चांगलं वाटत आहे. आज सकाळी आमचं चांगलं दर्शन झालं. काल आम्ही ट्रेलर रिलीज केला. हा एक मंत्रमुग्ध करणारी भावना असून शब्दात मांडू शकत नाही".
'आदिपुरुष' चित्रपट रामायणावर आधारित असून प्रभास प्रभू श्रीराम आणि क्रिती सीतामातेच्या भूमिकेत दिसणार आहे. तर सैफ अली खान रावणाची भूमिका निभावत आहे. प्रभासच्या करिअरमधील हा सर्वात मोठा चित्रपट असल्याचं बोललं जात आहे. 16 जूनला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.