संतोष देशमुखांच्या मारेक-यांचा पोलिसांना गुंगारा; आरोपांच्या शोधासाठी बक्षीस जाहीर

बीडमधील संतोष देशमुख खून प्रकरणातील तीन आरोपी अद्यापही फरार आहे. सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे पोलिसांना गुंगारा देत आहे.  या आरोपींना पकडण्यात पोलिसांना आणि सीआयडीला अपयश येत आहे का असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे.

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jan 2, 2025, 06:52 PM IST
संतोष देशमुखांच्या मारेक-यांचा पोलिसांना गुंगारा; आरोपांच्या शोधासाठी बक्षीस जाहीर  title=

विष्णू बुरगे, झी २४ तास, बीड :  संतोष देशमुख क्रूर हत्येला 22 दिवस झाले पण त्यांच्या हत्येतील प्रमुख 3 आरोपी पोलिसांना सापडलेले नाहीत. देशातील सर्वोत्तम पोलीस दल असलेल्या महाराष्ट्र पोलिसांना तिघे आरोपी गुंगारा देतायत. बीड पोलीस आणि सीआयडी आणि एसआयटीकडून आरोपींचा शोध सुरु आहे. पण हे आरोपी आकाशात लपलेत की पाताळात?, पोलिसांना ते सापडत नाहीत. सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे तिन्ही आरोपी पोलिसांना चकवा देत आहेत. पोलिसांची 7 पथकं राज्यासह देशभर सुदर्शन घुलेच्या मागावर आहेत. सीआयडीलाही हे आरोपी सापडू शकत नाहीत याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जातं केलं.

 फरार आरोपींना पकडून देणा-यास पोलिसांनी बक्षीस जाहीर केलं आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकांकडून प्रसिद्धीपत्रक जारी करून बक्षिसाची घोषणा केली आहे. आरोपीला पकडून दिल्यास योग्य बक्षीस दिलं जाईल आणि नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असंही पोलिसांनी सांगितलं.

सुदर्शन घुले हा सराईत गुन्हेगार आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणापूर्वी अनेक गुन्ह्यांत सुदर्शनचं नाव समोर आलेलं आहे. बीड जिल्ह्यातील हा आरोपी पकडण्यात पोलिसांना अद्याप यश का आलं नाही, असा सवाल आता विचारला जात आहे. याप्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आली असून पथक बीडच्या केजमध्ये दाखल झालं आहे. सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराडचे संबंध जगजाहीर आहेत. सुदर्शन घुलेला पकडल्यानंतर यामागील राजकीय कनेक्शनही उघड होण्याची शक्यता आहे. सुदर्शन घुले पोलिसांना सापडत नाही की त्याला शोधण्याचं सोंग केलं जातंय असा सवाल बीडकरांकडून केला जात आहे.