close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

'मी बोललो त्यात गैर काय?'

औचित्यभंग झालाच नाही. 

Updated: Feb 10, 2019, 02:49 PM IST
'मी बोललो त्यात गैर काय?'

पुणे : राष्ट्रीय अधुनिक कला संग्रहालय अर्थात नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट (NGMA)मध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका प्रदर्शनाच्या उदघाटन प्रसंगी ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांना एका अनपेक्षित परिस्थितीचा सामना करावा लागला होता. भाषण करतानाच त्यांना रोखलं गेल्यामुळे एका नव्या वादाला वाचा फुटली होती. ज्यानंतर पुण्यात एका पत्रकार परिषदेत त्यांनी झाल्या प्रकाराबद्दल खंत व्यक्त करत आयोजकांसमोर काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले. 

पालेकर यांच्या या पत्रकार परिषदेच त्यांची पत्नी संध्या पालेकर यांचीही उपस्थिती होती. त्यासुद्धा एनजीएमएमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला हजर होत्या आणि जे काही घडलं ते सर्व त्यांच्या समोरच घडलं ही बाब यावेळी पालेकर यांनी नमूद केली. 

कार्यक्रमावेळी नेमकं काय घडलं याची पुवरावृत्ती न करता तो प्रसंग ओढवलाच का? असा प्रश्न त्यांनी वारंवार उपस्थित केला.  एखाद्या वक्त्याला कार्यक्रमात आमंत्रित केलं जातं त्यावेळी त्यांना संबंधित कार्यक्रमाविषयी कल्पना देणं अपेक्षित असतं. जे यावेळी करण्यात आलं नाही. कार्यक्रमावेळी काय बोलावं किंवा काय बोलू नये याविषयीही कोणतीच माहिती आपल्याला देण्यात आली नव्हती, ही महत्त्वाची बाब त्यांनी स्पष्ट केली. 

'आपण कार्यक्रमावेळी केलेल्या भाषणामध्ये एनजीएमए, त्यात करण्यात आलेले महत्त्वाचे बदल आणि ते बदल करण्याचे निर्णय नेमके कोणी घेतले याविषयीच वक्तव्य केलं. मुळात त्या मंचावरुन एनजीएमएबद्दल बोलणं हे औचित्य कसं नव्हतं हा मुद्दाच नाही', असं म्हणत आपण केलेलं वक्तव्य गैर कसं? हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कार्यक्रमात झाल्या प्रकाराला आणि या विषयाला फाटे फोडण्यात आलं हे संपूर्ण चुकीचं असल्याचं ठाम मत त्यांनी यावेळी मांडलं. 

'प्रभाकर बर्वे यांचं हे प्रदर्शन हे कदाचित त्या वास्तीमध्ये घडणारे अखेरचं रेट्रोस्पेक्टीव्ह असल्याचं माझ्या कानावर आलं', असं म्हणत इतक्या महान चित्रकाराच्या निधनानंतर २४ वर्षांनी बर्वे यांच्या चित्रांचं प्रदर्शन आयोजित करण्यात येणं हीच किती दु:खदायक गोष्ट आहे? अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. 

आपल्या वक्तव्याच्या माध्यमातून कलावंतांच्याप्रश्नांना वाचा फोडण्याचाच प्रयत्न करत असल्याचा मुद्दा मांडत त्यांनी थेट शब्दांमध्ये झाल्या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली. 'मुळात एनजीएमए ही वास्तू कलाकारांना आणि कलाप्रेमींना वंदनीय असून, सध्याच्या घडीला त्यात घडवून आणले जाणारे अतिव महत्त्वाचे बदल, त्याविषयी फार कोणालाही माहिती नसणं आणि मुळात हे बदल करण्याचे निर्णय कोणाकडून घेतले जात आहेत हेसुद्धा कळू न देणं याविषयीच मी बोलत होतो. अशा वेळीच मला रोखलं जाणं, हे असं का व्हावं?', हाच प्रश्न त्यांनी या पत्रकार परिषदेत मांडला. पालेकर यांनी मांडलेल्या प्रश्नांवर आता एनजीएमएकडून काही उत्तर दिलं जाणार का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. 

काय होतं नेमकं प्रकरण? 

विविध विषयांवर आपली मतं अगदी खुलेपणाने मांडणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक अमोल पालेकर यांना एका वेगळ्या परिस्थितीचा सामना करावा लागला आहे. राष्ट्रीय अधुनिक कला संग्रहालय अर्थात नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट (NGMA)मध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका प्रदर्शनाच्या उदघाटन प्रसंगी ते भाषण करत असतानाच त्यांना थांबवण्यात आलं आणि पालेकरांनाही ही बाब खटकली.  यावेळी भाषण सुरु असतानाच त्यांनी राष्ट्रीय अधुनिक कला संग्रहलायासंदर्भात सरकारच्या हस्तक्षेपाबद्दल वक्तव्य करण्यास सुरुवात केली ज्यामुळे त्यांना भाषणादरम्यान वारंवार रोखण्यात आलं. अखेर त्यांचं हे भाषण अपूर्णच राहिलं होतं.