Exclusive : पाहा 'कारभारी लयभारी' मालिकेतील मुख्य कलाकारांची पहिली झलक

काही आठवतंय का? 

Updated: Oct 7, 2020, 07:18 PM IST
Exclusive : पाहा 'कारभारी लयभारी' मालिकेतील मुख्य कलाकारांची पहिली झलक

मुंबई : विविध विषयांवर भाष्य करणाऱ्या मराठी मालिका विश्वात आता आणखी एका मालिकेची जोड मिळणार आहे. काही दिवसांपूर्वीच या मालिकेचा पहिला प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीलाही आला. 'कारभारी लयभारी' असं या मालिकेचं नाव.

मालिकेच्या पहिल्या प्रोमोमध्ये एका राजकीय पक्षाची सभा आणि त्या सभेला संबोधित करणारा नेता दाखवण्यात आला होता. 'कारभारी लयभारी' या झी मराठीवरच्या नवीन मालिकेच्या प्रोमो रिलीझनंतर मालिकेबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली. प्रमुख भूमिकेत असलेल्या कलाकाराची उभं राहण्याची आणि भाषणाची स्टाईल पाहता, हि मालिका राजकारणावर भाष्य करणारी आहे असा तर्क लावत अनेकांनी काही बिंदूही जोडले.

आता हीच उत्सुकता शिगेला पोहोचलेली असताना मालिकेतील मुख्य भूमिका साकारणाऱ्या कलाकारांवरुन पडदा उचलण्यात आला आहे. आता भाषण करणारी व्यक्ती कोण, हा प्रश्न तुमच्याही मनात घर करत असेल हा व्हिडिओ आहे त्याचं उत्तरं.

मुख्य भूमिकेत झळकणाऱ्या कलाकारांची पहिली झलक पाहिल्यानंतर हा अभिनेता याआधीही आपण कुठंतरी पाहिला आहे, याची आठवण तुम्हाला झालीच असेल. अगदी बरोबर.... 'लागीरं झालं जी' या मालिकेतील विक्रम म्हणजेच निखिल चव्हाण इथं एका नव्या भूमिकेतून तुमच्या भेटीला आला आहे. शिवाय ही राजकारणाची जोड असणारी एक प्रेमकहाणी आहे हेसुद्धा व्हिडिओ पाहून लक्षात येत आहे. तेव्हा आता प्रेम आणि राजकारणाची सांगड घालणारी ही मालिका येत्या काळात प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडण्यात कितपत यशस्वी ठरते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.