SRK-Priyanka Affair: प्रियंकाबरोबरच्या अफेरबद्दलच्या प्रश्नावर शाहरुख म्हणालेला, "अशा गोष्टींबद्दल..."

Shah Rukh Khan Priyanka Chopra Affair : या दोघांच्या प्रेमसंबंधांची तुफान चर्चा काही वर्षांपूर्वी रंगली होती. अनेक कार्यक्रमांबरोबरच वेगवेगळ्या पार्ट्यांमध्येही हे दोघे अनेकदा एकत्रच दिसायचे त्यामुळे हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरु झालेल्या.

Updated: Jan 13, 2023, 01:28 PM IST
SRK-Priyanka Affair: प्रियंकाबरोबरच्या अफेरबद्दलच्या प्रश्नावर शाहरुख म्हणालेला, "अशा गोष्टींबद्दल..." title=
Shah Rukh Khan Priyanka Chopra Affair (Photo- Social Media)

Shah Rukh Khan Priyanka Chopra Affair: चित्रपटसृष्टीबद्दल चर्चा करायची झाली तर अफवा, स्कॅण्डल आणि गॉसीप यासारख्या पेज थ्री गोष्टी वगळता येत नाहीत. सामान्यपणे कॅमेरामागे किंवा पडद्यामागे नेमकं काय घडतं हे सर्वसामान्यांपर्यंत कधी पोहचत नाही असंही म्हटलं जातं. खास करुन कोण कोणाला डेट करतंय, महागड्या आणि आलिशान पार्ट्या, एकमेकांशी असलेलं वैर यासारख्या अनेक गोष्टी बऱ्याचदा पडद्या मागेच राहतात. मात्र कधीतरी एखाद्या कृतीवरुन या गोष्टी पेज थ्रीवरील बातम्यांमध्ये चर्चेचा विषय ठरतात. तर यापैकीच काही गोष्टी खास करुन अफवा वणव्यासारख्या पसरतात. अशाच प्रकारे बॉलिवूडचा बादशाह आणि सध्या 'पठाण' (Pathan Movie) चित्रपटामुळे चर्चेत असलेल्या शाहरुख खानबद्दल (Shah Rukh Khan) एक अफवा काही वर्षांपूर्वी पसरली होती. शाहरुख आणि अभिनेत्री प्रियंका चोप्राचं (Priyanka Chopra) अफेअर  (प्रेमसंबंध) आहेत अशी कुजबूज मनोरंजन क्षेत्रात सुरु झाली होती. 

अनेक ठिकाणी एकत्र दिसायचे

ऑनस्क्रीन भन्नाट केमिस्ट्री असलेल्या शाहरुख आणि प्रियंकाच्या जोडीच्या त्यावेळी फारच चर्चा होती. त्यांनी 'डॉन' आणि 'डॉन 2' या चित्रपटांमध्ये काम केलं होतं. याच कालावधीमध्ये हे दोघे अनेकदा एकत्र दिसून यायचे. अगदी पुरस्कार सोहळ्यांपासून ते रात्री उशीरापर्यंत चालणाऱ्या पार्ट्यांपर्यंत अनेक ठिकाणचे या दोघांचे फोटो त्यावेळी अगदी पेज थ्रीपासून ते बातम्यांपर्यंत सगळीकडेच चर्चेत राहिले. 

शाहरुख काय म्हणाला होता?

प्रियंका चोप्राबरोबरच याच कथित अफेअरबद्दल एकदा शाहरुख खानला एका मुलाखतीमध्ये थेट प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाला किंग खाननेही अगदीच प्रश्नाइतकेच भन्नाट उत्तर दिलं होतं. 'जब तक है जान' या चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी एका मुलाखतीत शाहरुखला प्रियंकाबरोबरच्या कथित अफेरबद्दल विचारण्यात आलं होतं. या प्रश्नाला उत्तर देताना शाहरुखने, "माझ्यासाठी सर्वात त्रासदायक गोष्ट ही आहे की माझ्याबरोबर काम करणाऱ्या माहिलेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. मी ज्याप्रकारे तिच्याबद्दल किंवा इतरही सर्वच स्त्रियांबद्दल सन्मान व्यक्त करतो तसं इथं होताना दिसत नाही हे खेदजनक आहे," असं म्हटलं होतं. 

"मी माफी मागतो कारण..."

"मला हे थोडं (आमचा) अपमान करणारं वाटतं. मी यासाठी माफी मागतो. माफी म्हणजे मी काहीतरी चुकीचं केलं आहे म्हणून माफी मागत नाही तर ती माझी मैत्रीण असल्याबद्दल माफी मागतो. ती माझ्या सर्वात जवळच्या मैत्रिणींपैकी एक आहे. ती माझ्या हृदयाच्या फार जवळच्या व्यक्तींपैकी एक आहे आणि कायम राहील," असं शाहरुख प्रियंकाबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना या मुलाखतीत म्हणाला होता. 

"त्या मैत्रीबद्दल काहीही बोललं जात असेल तर..."

"अशा गोष्टींबद्दल चर्चा होते तेव्हा मी याबद्दल काही बोलायला नको असं मला वाटतं. कारण या गोष्टी फारच सर्वसाधारण, छोट्या आणि अगदीच शुल्लक असतात. अशा गोष्टींमुळे एकत्र काम करणाऱ्या लोकांमधील नातं खराब होतं. ती एक लहान मुलगी आहे जिने मीस इंडियापासून सुरुवात केली. आम्ही कॅमेरासमोर काही छान क्षण मित्र-मैत्रीण म्हणून एकमेकांबरोबर शेअर केले आहेत. त्याबद्दल अशी चर्चा होणं दुर्देवी आहे. अशाप्रकारच्या मैत्रीला अशा चर्चांमुळे फटका बसत असेल, त्या मैत्रीबद्दल काहीही बोललं जात असेल तर मला फार वाईट वाटतं आणि मी दु:खी होतो," असं शाहरुख म्हणाला होता.

मैत्रीवर परिणाम झाला का? या प्रश्नावर शाहरुखने दिलेलं उत्तर

या अफवांमुळे तुझ्या आणि प्रियंकाच्या मैत्रीत फूट पडली आहे का असा प्रश्नही यावेळी शाहरुखला विचारण्यात आला. "नाही अजिबात नाही. मला वाटतं ती तेवढी समजूतदार आहे की ती हे सारं हाताळू शकते. मात्र आपण दोन व्यक्तींना पूर्णपणे समजून न घेता त्यांच्यातील कोणत्याही नात्याला लगेच नाव देण्याची घाई करतो असं मला वाटतं. हे फार विचित्र आहे. केवळ प्रसारमाध्यमे नाही तर आपल्या सर्वांचं असं होतं," असं शाहरुखने म्हटलं होतं.