मुंबई : शाहिद कपूर आणि किआरा अडवाणी यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या 'कबीर सिंग' या चित्रपटाच्या कमाईचे आकडे दिवसागणिक वाढतच आहेत. असं असलं तरीही चित्रपटाला सकारात्मक प्रतिक्रियांऐवजी बऱ्याच अंशी नकारात्मक प्रतिक्रियांचा सामना करावा लागला आहे. खुद्द दिग्दर्शक संदीप वंगाने या प्रतिक्रियांविषयी नाराजी व्यक्त केली.
चित्रपटाविषयी सुरु असणाऱ्या नकारात्मक वातावरणात तो 'कबीर सिंग'ची ढाल होऊन उभा राहिला आहे. एका मुलाखतीत त्याने चित्रपट आणि कथानकाविषयीचे विचार स्पष्ट केले. 'या चित्रपटाची सुरुवात केली त्याच वेळी हा सुपरहिट चित्रपट असणार असल्याचं मला ठाऊक होतं. पण, त्याच्याविषयी असं नकारात्मक तेही या स्तरावरील नकारात्मक वातावरण पाहायला मिळेल याची मात्र मी कल्पनाही केली नव्हती', असं तो म्हणाला. हे सारंकाही अतिशय धक्कादायक असल्याचं म्हणत त्याने खंत व्यक्त केली.
अभिनेता शाहिद कपूरच्या करिअरमधील सुपहिट आणि सर्वाधिक तगडी कमाई करणाऱ्या या चित्रपटाविषयी दिग्दर्शकाने काही महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट केल्या. चित्रपटातून महिलांना दिल्या गेलेल्या वागणुकीच्या दृश्यांविषयी सांगत संदीप म्हणाला, 'ज्यावेळी तुम्ही एखाद्याच्या प्रेमात आकंठ बुडालेले असता आणि त्याच वेळी तुम्हाला एकमेकांच्या कानशिलात लगावण्याचाही हक्क नसेल तर, मला नाही वाटत हे खरं नातं आहे.'
टीकाकारांना सडेतोड उत्तर देत त्यांनी खऱ्या प्रेमाचा कधीच अनुभव घेतला नसावा; कारण ही संकल्पनाच त्यांच्यासाठी नवी आहे, असा टोलाही त्याने लगावला. अर्जुन रेड्डी या चित्रपटाच्या मुळ भागाविषयी तेलुगू प्रेक्षकांनी चित्रपटातील विविध घटकांविषयी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. पण, अथे मात्र स्त्रीवादावरच जास्त भर दिला गेल्याचं म्हणत आता लोक आपला राग करत असावेत असं त्याने स्पष्ट केलं.
'कबीर सिंग' या चित्रपटात ज्यावेळी 'कबीर' हा 'प्रीती'च्या कानशिलात लगावतो त्या दृश्याविषयी सांगत तिने त्याला विनाकारण मारलं; कमीत कमी तिच्यावर हात उचलताना 'कबीर'कडे कारण तरी होतं असं स्पष्टीकरण त्याने दिलं. पुढे, 'तुम्ही कानशिलात लगावू शकत नाही, तुम्ही वाटेल तेव्हा तिला (तुमच्या प्रेयसीला, पत्नीला) स्पर्श करु शकत नाही तर मला यामध्ये कोणत्याची प्रकारच्या भावना दिसतच नाहीत', असं तो म्हणाला. संदीपच्या या वक्तव्यानंतर कलाविश्वात त्याविषयीच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.