मुंबई : ड्रग्ज केस प्रकरणात अडकलेल्या अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला 8 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे. त्याच्यासोबतच आणखी 8 जणांनीही एनसीबीच्या कोठडीत आणखी एक रात्र काढली. दरम्यान, आर्यनबाबतची सुनावणी सुरु असताना तिथं एका खास व्यक्तीचीही हजेरी होत. (Aryan khan drugs case)
ही व्यक्ती म्हणजे शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी. सूत्रांच्या माहितीनुसार सुनावणीदरम्यान, पूजा सतत रडत होती. तिच्या अश्रूंचा बांध फुटला होता. आर्यनची अवस्था तिला पाहावत नव्हती.
आर्यन यावेळी काय म्हणाला?
आर्यन खान अद्यापही ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या ताब्यात आहे. या प्रकरणामध्ये नेमकं काय घडलं याची माहिती आर्यननं न्यायालयापुढे मांडली. वकिलांशी संवाद साधत तो म्हणाला, ‘मी क्रूज टर्मिनलवर पोहोचलो, जिथं अरबाजही होता. मी त्याला ओळखत होतो त्यामुळं आम्ही एकत्रच त्या जहाजाकडे वळलो. मी तिथं गेलो तेव्हाच त्यानं मला विचारलं की ड्रग्ज आणले आहेस का? मी नकारार्थी उत्तर दिलं. त्यांनी माझी बॅग तपासून पाहिली. पण, माझ्याकडे काहीच मिळालं नाही. यानंतर माझा फोन त्यानी घेतला आणि मला थेट एनसीबीच्या कार्यालयात आणलं. रात्री दीड- दोन वाजण्याच्या सुमारास मला वकिलांना भेटू दिलं.’
ड्रग्ज प्रकरणामध्ये 4 ऑक्टोबरला झालेल्या सुनावणीदरम्यान काही धक्कादायक माहिती उघड झाली. एनसीबीच्या वतीनं आर्यनच्या फोनमध्ये असणाऱ्या फोटोंमध्ये काही धक्कादायक माहिती असल्याचं सांगण्यात आलं. ज्याच्या चौकशीसाठी एनसीबीनं 11 ऑक्टोबरपर्यंत कोठडी वाढवून देण्याची मागणी केली.
आर्यनच्या फोनमध्ये सापडलेल्या ऐवजानुसार त्याचा संपर्क आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करीशी जोडला जात आहे. एनसीबीच्या सांगण्यानुसार चॅटमध्ये अनेक कोड नेम आहेत, ज्याचा उलगडा करण्यासाठी आर्यनची कस्टडी महत्त्वाची आहे. आता 8 ऑक्टोबरला म्हणजेच किमान आज तरी आर्यनला अंतरिम जामीन मंजूर होतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.