जान कुमार सानूला Big Boss मधून हाकला, अन्यथा... - प्रताप सरनाईक

सलमान खानच्या टीमशी देखील संवाद 

Updated: Oct 28, 2020, 02:48 PM IST
जान कुमार सानूला Big Boss मधून हाकला, अन्यथा... - प्रताप सरनाईक

मुंबई : बिग बॉसमधील १४ व्या सीझनचा स्पर्धक जान कुमार सानू याला मनसेपाठोपाठ आता शिवसेनेकडून इशारा देण्यात आला आहे. शिवसेनेचे नेते आमदार प्रताप सरनाईक यांनी आपण शिवसेना स्टाईल दाखवू असा इशारा दिला आहे. 

घरातील स्पर्धक आणि प्रसिद्ध गायक कुमार सानूचा मुलगा जान कुमार सानूने,'मला मराठीची चीड येते', असे म्हणत मराठी भाषेचा अपमान केला आहे., मुजोर जान कुमार सानू याची या मालिकेतून हकालपट्टी केली नाही, तर सेटवर येऊन शिवसेना आपल्या पद्धतीने आंदोलन करेल, असा सज्जड इशारा शिवसेना प्रवक्ते आमदार प्रताप सरनाईक यांनी कलर्स वाहिनीला दिला आहे.

एवढंच नव्हे तर प्रताप सरनाईक यांनी सलमान खानच्या पीआरओ टीमशी संपर्क साधून जान सानूला समज देण्यास सांगितले आहे. अन्यथा त्याला शिवसेनेचा आक्रोशाला सामोरं जावं लागेल. 

महेश टिळेकर यांनी देखील एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून जान कुमार सानूवर जोरदार टीका केली आहे. “महाराष्ट्रात राहून या कलाकारांना मराठीची लाज का वाटते? प्रसिद्ध गायक कुमार सानू मुंबईत राहतात, मराठी लोकांनीही त्यांची गाणी ऐकली त्यांना मोठं करण्यात महाराष्ट्राचा वाटा आहेच पण कुमार सानू यांचा हा दिवटा मुलगा जान सानू सध्या बिग बॉस मध्ये सहभागी आहे. तिथं तो त्याच्याशी मराठीत बोलणाऱ्या सहकलाकाराला मराठी बोलू नको म्हणून सांगतोय. मुंबईत राहून याला मराठी भाषेबद्दल इतका राग आहे तर याने महाराष्ट्रात तरी का रहावे?” अशा शब्दात महेश यांनी जान कुमार सानूबाबत संताप व्यक्त केला.