मुंबई : अभिनेता श्रेयस तळपदेने त्याच्या करियरची सुरूवात मराठी मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून केली. त्यानंतर श्रेयसने आपला मोर्चा हिंदी कलाविश्वाकडे वळवला. ‘इकबाल’, ‘अपना सपना मनी मनी’, ‘ओम शांती ओम’, ‘गोलमाल’ आणि ‘हाउसफुल’ यांसारख्या अनेक चित्रपटांच्या माध्यमातून श्रेयस चाहत्यांच्या भेटीला आला आणि त्यानी त्याच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली. पण बॉलिवूडमध्ये श्रेयसला हवं तसं करियर करता आलं नाही.
टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत श्रेयसने बॉलिवूडमधील अनेक गोष्टींचा खुलासा केलेला आहे. श्रेयसने त्याच्या अपयशामागचं प्रमुख कारण मार्केटिंग असल्याचं सांगितलं आहे. श्रेयस म्हणाला, 'एक सोलो चित्रपट यशस्वी ठरला नाही, याचा अर्थ तर चित्रपटहबीही चालणार नाहीत असा नसतो. मी अनेक सोलो चित्रपटांमध्ये काम केलं आहे. पण मी स्वतःचं मार्केटिंग करण्यात अपयशी ठरलो. मला प्रसिद्धी न मिळण्याचं मोठं कारण मार्केटिंग आहे. '
पुढे श्रेयस म्हणाला, 'माझ्या चांगल्या मित्रांनीचं माझ्या पाठीत खंजीर खुपसला. माझ्यासोबत स्क्रिन शेअर करणं त्यांना असुरक्षित वाटतं होतं आणि हे माझ्या लक्षात आलं होतं. मित्रांच्या हितासाठी मी काही चित्रपट केले. माझे अनेक मित्र त्यांच्या करियरमध्ये पुढे निघून गेले. त्यांनी अनेक मोठे चित्रपट केले. इंडस्ट्रीमध्ये ९० टक्के लोक तुमच्या ओळखीचे असतात आणि फक्त १० लोक असे असतात ते तुमच्या चांगल्या कामावर मनापासून खूप होतात.' असं देखील श्रेयस म्हणला.
पुढे त्याने महानायक बिग बींचं देखील उदाहरण दिलं, 'अमिताभ बच्चन यांनी देखील त्यांच्या करियरमध्ये अनेक संकटांचा सामना केला आहे. पण त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. मी अजूनही चांगल्या भूमिकेच्या प्रतिक्षेत आहे. अभिनय करतच मला मरायचंय.. एखाद्या सेटवर किंवा मंचावर...' असं म्हणतं श्रेयसने त्याच्या भावना व्यक्त केल्या.