मुंबई : कोणतही नातं टिकवण्यासाठी, ते खुलवण्यासाठी महत्त्वाचं असतं ते त्या नात्यात असणारं प्रेम.
प्रेम ही अशी भावना आहे जी प्रत्येकाने आपल्या आयुष्यात किमान एकदा तरी अनुभवलेली असते. मग ते प्रेम प्रियकर प्रेयसीचं असो, आई मुलाचं किंवा नवरा बायकोचं. नातेसंबंध आणि त्यात असणारं प्रेम वेगवेगळ्या कथांच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आणावं या उद्देशाने झी युवावर २२ जानेवारी पासून सोमवार आणि मंगळवार रात्री ९ :३० वाजता 'गुलमोहर 'ही प्रेम, भावना आणि नातेसंबंध यांवर आधारित विविध कथा सांगणारी नवीन मालिका सुरु होत आहे.
गुलमोहर मध्ये नाते संबंधांवर आधारित एक सुंदर अनुभव सोमवारी आणि मंगळवारी अनुभवायला मिळेल. या मालिकेतून अनेक मोठे आणि आवडते कलाकार झी युवाच्या प्रेक्षकांना भेटायला येणार आहेत. पहिली गोष्ट ही आयुष्यात हसणं कसं आणि किती महत्वाचं असत याचा प्रत्यय देईल. या मालिकेद्वारे मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध सिनेअभिनेता श्रेयस तळपदे अनेक वर्षांनी छोट्या पडद्यावर येत आहे. या पहिल्या गोष्टीत त्याला अभिनेत्री गिरीजा गोडबोले साथ देत आहे. श्रेयस ला त्याच्या छोट्या पडद्यावरील पुनरागमनाबद्दल विचारले असता तो म्हणाला, ' झी नेटवर्क म्हणजे दर्जेदार मनोरंजनाचा खजिना, नवे पर्व...युवा सर्व "असे बिरूद घेऊन आलेल्या झी युवा या नव्या चॅनेलने वर्षभरातच युवास्पंदने अचूक टिपली.
मैत्रीतील जीवाभावाचे सख्य, कॉलेजमधील मोरपंखी दिवस, प्रेमात पडल्यानंतरचा नवथरपणा, हॉस्टेललाइफ अशा आजच्या तरूणाईच्या भावविश्वाचे आकाशच जणू झी युवा या चॅनेलने आपल्या कवेत घेतले. त्यामुळेच झी युवा वाहिनीने जेव्हा मला ' गुलमोहर 'या मालिकेतील पहिल्या गोष्टीबद्दल विचारले तेव्हा मी लगेच तयार झालो. या गोष्टीत गिरीजा गोडबोले माझ्याबरोबर असून मंदार देवस्थळी सारखे उत्तम दिग्दर्शक ही मालिका दिग्दर्शित करत आहेत.
झी युवा आणि झी टॉकीज चे बिझिनेस हेड बवेश जानवलेकर यांनी सांगितले ' प्रेक्षकांना आवडतील आणि मनाला भावतील अश्या मालिका झी युवा देण्याचा प्रयत्न करीत आहे. 'गुलमोहर' 'ही मालिका केवळ प्रेम नव्हे तर त्याहुन जास्त, मानवी भावभावना आणि नातेसंबंधांवर एक वेगळी भूमिका सांगणारी एपिसोडिक मालिका आहे. या मालिकेत अनेक नावाजलेले चेहरे प्रेक्षकांना पाहायला मिळतील. ज्या प्रमाणे प्रेक्षक झी युवा वरील इतर मालिकांवर करीत आहेत, त्याच प्रकारे गुलमोहर वर सुद्धा प्रेम करतील ही आशा करतो.