मुंबई : मोहित सुरी दिग्दर्शित 'हाफ गर्लफ्रेंड' या चित्रपटासाठी सर्वप्रथम अभिनेता सुशांत सिंह राजपूतची निवड करण्यात आली होती. या संदर्भातील लेखक चेतन भगत यांचं जुनं ट्विट पुन्हा तुफान व्हायरल होत आहे. चित्रपटासाठी सुशांतची निवड करण्यात आली होती, तर मग अभिनेता अर्जुन कपूरला चित्रपटात का घेतलं? असे अनेक प्रश्न सध्या सोशल मीडियावर जोर धरत आहेत. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर बॉलिवूडमधल्या घराणेशाहीचा वाद पुन्हा एकदा तुफान रंगला आहे. त्यानंतर आता चेतन भगत यांच्या जुन्या ट्विटमुळे ट्विटरवर अभिनेता अर्जुन कपूर जोरदार ट्रेण्ड होऊ लागला आहे.
सुशांतची जागा अर्जुन कपूरने का घेतली यामागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. 'हाफ गर्लफ्रेंड या चित्रपटासाठी अभिनेता सुशांत सिंह राजपूतची निवड करण्यात आली आहे.' असं ट्विट चेतन भागत यांनी केलं होतं. तर दुसरीकडे, "माझ्या चित्रपटासाठी मला सुशांत सिंह राजपूत सारखा अभिनेता मिळाला म्हणून मी फार आनंदी आहे." टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत मोहित सुरी यांनी आपला अनंद व्यक्त केला.
So happy to share @itsSSR will play lead in @mohit11481 directed Half Girlfriend. Shooting begins 1Q16. https://t.co/dUHSVZ2FQ5
— Chetan Bhagat (@chetan_bhagat) November 7, 2015
And this is Nepotism Arjun Kapoor @arjunk26 so shameful #boycottstarkids https://t.co/PhMVroixZP
— Aarzoo (@amazing_aarzoo) June 24, 2020
दरम्यान, सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटी किड्सच्या चाहत्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. तर अभिनेत्री कंगना रानौत सारख्या बाहेरून आलेल्या आणि बॉलिवूडमध्ये आपले वर्चस्व निर्माण करणाऱ्या कलाकारांच्या फॉलोअर्सच्या संख्येत वाढ झाली आहे.
सुशांतच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर अनेक नव्या चर्चांना उधाण आले आहे. पोलीस देखील याप्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. आतापर्यंत याप्रकरणी अनेकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. परंतु अद्यापही पोलिसांच्या हाती त्याच्या आत्महत्येमागचं ठोस कारण लागलेलं नाही.