मुंबई : सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदावरून वादग्रस्त पहलाज निहलानी गेले असले तरी जाण्यापूर्वी त्यांनी काही सिनेमांसाठी केलेल्या सूचनांमुळे त्या निर्मात्यांची कोंडी झाली आहे. आगामी ‘अ जेंटलमन’ सिनेमावरही कात्री चालवली आहे. त्यामुळे निहलानी जाता जाताही अनेकांना कात्री लावून गेल्याचे दिसत आहे.
सिद्धार्थ मल्होत्रा-जॅकलिन फर्नांडिसच्या सिनेमावर कात्री चालवली. ‘अ जेंटलमन’ चित्रपटातील सिद्धार्थचा किस अनावश्यक असल्याचं सांगत निहलानी यांनी किसींग सीनची लांबी कमी करण्यास सुचवलं होतं. इतकंच नाहीतर या सिनेमाला यूए सर्टिफिकेट हवं असल्यास त्यातील किसींग सीन ७० टक्क्यांनी कमी करावा, असं पहलाज यांनी निर्मात्यांना सांगितल्याचं वृत्त आहे.
Iss film mein Action hai, Romance hai, Comedy hai aur iska trailer aaraha hai Monday 12 noon! Get set for #AGentleman with @Asli_Jacqueline pic.twitter.com/ceUS199FiE
— Sidharth Malhotra (@S1dharthM) July 8, 2017
सिनेमाचं नाव ‘अ जेंटलमन’ आहे, मात्र किस करताना हिरोला त्याचा विसर पडल्याचं निहलानी म्हणाले. हा सीन सिनेमात उगाचच घुसवला आहे. हिरोने किस करताना आपल्या मर्यादा सोडल्याचंही सेन्सॉर बोर्डाने म्हटलं. त्यामुळे या सिनेमातील किसींग सीन आता कापला जाणार का हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
काही दिवसांपूर्वीच सेन्सॉर बोर्डाचे सर्वात जास्त वादग्रस्त ठरलेले अध्यक्ष पहलाज निहलानी यांची अध्यक्ष पदावरुन हकालपट्टी करण्यात आली. त्यांच्या जागी आता प्रसिद्ध गीतकार प्रसून जोशी यांची वर्णी लागली आहे. त्यामुळे त्यांची कारकिर्द कशी ठरते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.