मुंबई : कोरोनाचा उद्रेक दिवसागणिक वाढताना दिसत आहे. सतत वाईट बातम्या कानावर येत आहे. कोरोना या एका अदृष्य विषाणूने संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. अनेकांनी आपल्या जवळच्या माणसांना गमावलं आहे. आज देशातला प्रत्येक जण चांगल्या दिवसाच्या प्रतीक्षेत आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी प्रत्येक जण स्वतःच्या परीने प्रयत्न करत आहे. तर अभिनेता सोनू सुदतर प्रत्येकासाठी देवदूता प्रमाणे काम करत आहे. गेल्या वर्षाभरापासून तो कोरोना रूग्णांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मदतीसाठी दिवस रात्र धावत आहे.
या प्रवासात या देवदूताला अनेक कठीण प्रसंगांचा सामना करावा लागत आहे. सोनूच्या अथक प्रतयत्नांनतरही त्याला एका मुलीचा जीव वाचवणं शक्य झालं नाही. यामुळे सोनूला प्रचंड दु:ख झालं आहे. सोनू सुदने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. सोनूची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
ट्विट करत सोनू म्हणाला, 'मी ज्या नागपूरमधील 25 वर्षीय मुलगी भारतीला एअर अॅम्ब्युलन्सने हैदराबादला नेलं होतं तिचं काल रात्री हैदराबादमध्ये निधन झालं.ECMO मशीनच्या मदतीने ती महिनाभर जिवंत होती. तिच्या कुटुंबातील आणि इतर सर्वांनी तिच्यासाठी प्रार्थना केली त्या सगळ्यांसाठी मला वाईट वाटतंय. '
पुढे सोनू म्हणाला, 'मी तिला वाचवू शकलो असतो पण... आयुष्य फार अस्थिर आहे' अशा भावना भारती प्रती सोनू सुदने व्यक्त केल्या. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशाची परिस्थिती अत्यंत भयंकर झाली आहे. कोरोनाचा कहर वाढत असल्यामुळे सरकारने नियम अधिक कठोर केले आहेत.